कुंबळेचा राजीनामा!
By admin | Published: June 21, 2017 03:14 AM2017-06-21T03:14:14+5:302017-06-21T03:14:14+5:30
कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील कथित वाद प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटविश्व ढवळून निघत असतानाच
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील कथित वाद प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटविश्व ढवळून निघत असतानाच, कुंबळेने आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झाला. मात्र, संघासोबत कुंबळे न गेल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. कुंबळेचा कार्यकाळ जूनअखेर संपणार होता.
आयसीसीच्या वार्षिक संमेलनासाठी लंडनमध्ये थांबणे आवश्यक असल्याने संघासोबत रवाना झालो नाही, असे सांगून अनिल कुंबळेने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) चर्चा आहे की, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समिती दरम्यान झालेल्या बैठकीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रशिक्षक अनिल कुंबळेसोबतचे संबंध जवळजवळ संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी, बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी याबाबत प्रतिक्रिया देण्यास उपलब्ध नव्हते.
बीसीसीआयच्या एका अन्य पदाधिकाऱ्याने हे चांगले संकेत नसल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीची तारीख व वेस्ट इंडिज दौऱ्याचा कार्यक्रम महिनाभरापूर्वीपासून माहीत होता. आयसीसीची बैठक किंवा विंडीज दौरा यांच्यादरम्यान एकाची निवड करायची आहे, हे कुंबळेला माहीत नव्हते का ? कदाचित प्रशिक्षकपदी त्यांचे कायम राहणे कठीण बाब आहे.’
यशस्वी कारकीर्द
५ कसोटी
मालिका जिंकल्या.
आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावले.
घरच्या मैदानावर
१३ पैकी १० कसोटी सामने जिंकले.
वेस्ट इंडिजमध्ये
कसोटी मालिका जिंकली.