कुंबळे टीम इंडियाचे मुख्य कोच

By admin | Published: June 24, 2016 01:18 AM2016-06-24T01:18:21+5:302016-06-24T01:40:13+5:30

भारताचे माजी कर्णधार आणि देशातील सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू अनिल कुंबळे यांची गुरुवारी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली.

Kumble Team India's Chief Coach | कुंबळे टीम इंडियाचे मुख्य कोच

कुंबळे टीम इंडियाचे मुख्य कोच

Next

धरमशाला : भारताचे माजी कर्णधार आणि देशातील सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू अनिल कुंबळे यांची गुरुवारी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत कुंबळे यांची नवे भारतीय प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा केली. ते वर्षभराच्या कालावधीसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळतील. या पदासाठी शर्यतीत असलेल्या रवी शास्त्री यांच्यावर अनिल कुंबळेची ‘गुगली’ वरचढ ठरली़ ठाकूर यांनी कुंबळे यांच्या नावाची घोषणा करताना सांगितले की, ‘बीसीसीआयने प्रशिक्षक निवडण्यासाठी पारदर्शी प्रक्रियेचे पालन केले. आम्ही प्रशिक्षकपदासाठी निकष ठरविले होते. अनेकांनी या पदासाठी आपले अर्ज केले होते. निश्चित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवड समितीने कुंबळेच्या नावाची बीसीसीआयकडे शिफारस केली.’


ठाकूर पुढे म्हणाले, ‘निवड समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. त्यांनी विविध उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर कुंबळेच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आम्ही कुंबळेच्या नावावर सखोल चर्चा केली आणि टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सर्वांत उपयुक्त व्यक्ती असल्याचा निर्णय घेतला.’
बीसीसीआयने जाहिरात प्रकाशित केल्यानंतर ५७ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातून कुंबळे यांची निवड करण्यात आली. ५७ उमेदवारांमधून सुरुवातीला २१ उमेदवारांची निवड करण्यात आली.


कुंबळे यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकपदाचा अनुभव नाही. कुंबळे यांनी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू व मुंबई इंडियन्स या संघांच्या मेंटरपदाची जबाबदारी सांभाळली आहे. या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता कुंबळे यांची बाजू वरचढ ठरली. सपोर्ट स्टाफच्या नावाची घोषणा नंतर करण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षकपदाचा अनुभव नसताना कुंबळे यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याच्या निर्णयाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ठाकूर म्हणाले, या माजी फिरकीपटूची कामगिरी, ते या पदासाठी किती उपयुक्त आहेत, सर्व स्पष्ट करणारी आहे. सर्वांसोबत चर्चा केल्यानंतर कुंबळे यांच्या नियुक्तीबाबतचा निर्णय घेण्यात आला. असेही ठाकूर म्हणाले.

ठाकूर म्हणाले, ज्यावेळी आमच्याकडे नावे आली, त्या वेळी आम्ही अन्य हितचिंतकांसोबतही चर्चा केली. सर्वांकडून फिडबॅक घेतला. प्रक्रियेमध्ये पारदर्शिता राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो.’ ‘भारतात कोट्यवधी लोक क्रिकेटसोबत जुळलेले आहे. कुंबळे विंडीज दौऱ्यापासून आपले पद सांभाळतील.’

शास्त्री प्रदीर्घ कालावधीपासून संघासोबत जुळलेले आहेत, पण त्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ठाकूर म्हणाले,‘भारतीय कोच संघासाठी चांगले ठरले आहेत. संघाची कामगिरी निराशाजनक असताना शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली होती. शास्त्री यांची संघसंचालकपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर संघाची कामगिरी सुधारली. त्यांनी आपली भूमिका चोख बजावली. बोर्ड त्यांच्या कार्याबाबत समाधानी आहे.’ शिर्के यांनी सांगितले की, अंतिम यादीमध्ये ११ नावांचा समावेश होता. त्यात चार विदेशी होते. ज्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली त्यात कुंबळे, शास्त्री, मुडी, लॉ, अ‍ॅन्डी मोल्स, लालचंद राजपूत आणि प्रवीण आमरे आदींचा समावेश होता.’ (वृत्तसंस्था)

अजय शिर्के : वर्षभराच्या कालावधीनंतर कार्याची समीक्षा
बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के म्हणाले, ‘प्रथमच आम्ही प्रक्रियेनुसार प्रशिक्षकाची निवड केली. सुरुवातीला जाहिरात प्रकाशित करण्यात आली. ही प्रदीर्घ कालावधीची प्रक्रिया होती. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाव निश्चित करण्यात आले. त्यानंतर प्रदीर्घ काळ बैठकीमध्ये चर्चा झाली. ही व्यावसायिक नियुक्ती असल्यामुळे वर्षभराच्या कालावधीनंतर कार्याची समीक्षा करण्यात येईल, पण आम्हाला याची गरज भासणार नाही, अशी आशा आहे.’

कुंबळे खेळाडूंचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या फर्मचे संचालन करतात आणि त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे दुटप्पी भूमिका जोपासण्याची मुद्दा उपस्थित होतो, हा आरोप शिर्के यांनी फेटाळून लावला.
शिर्के म्हणाले,‘कॉमफ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट हा शब्द
आता फॅशन झाला आहे. निर्णय घेण्यापूर्वी या
मुद्यावर चर्चा झाली.’

कुंबळेसरांच्या बरोबर काम करण्यास उत्साहित आहे़ आपले प्रशिक्षक म्हणून स्वागत़ आपल्याबरोबर राहताना भारतीय क्रिकेटमध्ये काही चांगल्या गोष्टी होतील़
- विराट कोहली
या बरोबर भारताचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद, गुंडाप्पा विश्वनाथ, ईरापल्ली प्रसन्ना, वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन, हरभजन सिंग, बिशन सिंह बेदी यांनी कुंबळेला शुभेच्छा दिल्या़

भारतीय क्रिकेटसाठी ‘अच्छे दिन’
नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी अनिल कुंबळे यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना भारतीय क्रिकेटसाठी ‘अच्छे दिन’ येणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
कुंबळे उमेदीच्या काळात दिग्गज क्रिकेटपटू असले तरी त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा अनुभव नाही. गावसकर म्हणाले, की मुख्य प्रशिक्षक म्हणून कुंबळे यांची निवड योग्य आहे. गावस्कर पुढे म्हणाले, ‘‘प्रशिक्षणासाठी पदवीची गरज नसते. तुमचे मॅन मॅनेजमेंट योग्य असणे आवश्यक असते. कुंबळेंच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात संघामध्ये प्रतिबद्धता, अनुभव व बुद्धिमत्ता यांचा मेळ साधला जाईल. प्रशिक्षक म्हणून वर्षभराचा कालावधी पुरेसा आहे. कुंबळेंकडून खेळाडूंना बरेच काही शिकायला मिळेल.’’
गावसकर पुढे म्हणाले, ‘‘खेळाडूंनी गुगलवर कुंबळेंचे प्रो-फाईल बघितले तर त्यांनी काय मिळवले आहे, याची कल्पना येईल. ड्रेसिंग रूममध्ये त्याला आदर होता. तो भारताचा दिग्गज खेळाडू होता. शेवटी मैदानावर खेळाडूंना कामगिरी करावी लागत असली तरी कुंबळेंचा बाहेरून त्यांच्यासोबत सहभाग राहील.


मोठी जबाबदारी पेलण्यास सज्ज
कुंबळे म्हणाले,‘ही मोठी जबाबदारी असून ती पेलण्यासाठी सज्ज आहे. प्रशिक्षक नंतर आणि खेळाडू पूर्वी येतात. माझी रणनीती केवळ विजय मिळवण्याची आहे. आगामी मालिकेसाठी माझ्यासाठी छोट्या व दीर्घकालीन योजना आहे. मी एकटा कुठली योजना राबवू शकत नाही. त्यासाठी खेळाडूंच्या सहकार्याची गरज आहे. मी सचिन, सौरव, लक्ष्मण व द्रविड यांच्यासारख्या खेळाडूंसोबत बसून भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा करणार आहे.’
दरम्यान, अनिल कुंबळेची पत्नी चेतना रामतीर्थ यांनी सांगितले की,‘कुंबळेची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यामुळे आनंद झाला. आम्हाला त्यांची उणीव भासेल, पण भारतीय संघाला त्यांच्यापेक्षा चांगला प्रशिक्षक मिळू शकणार नाही.’

Web Title: Kumble Team India's Chief Coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.