कुंबळे यांचा अनुभव संघासाठी उपयुक्त : विराट
By admin | Published: July 4, 2016 06:03 PM2016-07-04T18:03:59+5:302016-07-04T18:03:59+5:30
नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा प्रदीर्घ अनुभव संघासाठी उपयुक्त सिद्ध होईल आणि त्यांच्या उपस्थितीमुळे गोलंदाज व फलंदाजांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळाली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
बेंगळुरू, दि. ४ : नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा प्रदीर्घ अनुभव संघासाठी उपयुक्त सिद्ध होईल आणि त्यांच्या उपस्थितीमुळे गोलंदाज व फलंदाजांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोमवारी व्यक्त केली. विंडीज दौºयावर रवाना होण्यापूर्वी सोमवारी कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेत बोलत होता.
विराट म्हणाला,‘कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा दिवसांच्या सराव शिबिरात मेहनत घेतली. फिरकीपटू व वेगवान गोलंदाजांना कुंबळे यांच्या उपस्थितीचा लाभ झाला. आमच्या प्रशिक्षकांकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. फलंदाजांचे मनोधैर्य उंचावण्यास त्यांच्या टिप्स उपयुक्त ठरल्या.’
विराट पुढे म्हणाला,‘रविवारी कुंबळे यांनी संघासाठी एक ‘सरप्राईज’ ठेवले होते. त्यामुळे खेळाडूंना एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळाली व संघात चांगले वातावरण निर्माण करण्यास मदत झाली. कुंबळे सरांचा हा प्रयत्न चांगला होता. कारण अनेकदा संघामध्ये चांगले वातावरण निर्माण करण्याचा विसर पडतो. संघामध्ये चांगले वातावरण असणे महत्त्वाचे आहे. महेंद्रसिंग धोनीही यावेळी उपस्थित होता. सर्वांना याचा आनंद मिळला. विंडीज दौ-यापूर्वी आमच्यासाठी ही महत्त्वाची बाब ठरली.’ भारतीय संघ २१ जुलै ते २२ आॅगस्ट या कालावधीत विंडीज दौ-यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना २१ जुलैपासून अॅन्टिग्वामध्ये खेळल्या जाईल.
विंडीज दौ-यात फलंदाजी व गोलंदाजी विभागाच्या तयारीबाबत बोलताना विराट म्हणाला,‘अनेक विभागांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, याची आम्हाला कल्पना आहे. फलंदाजीमध्ये मोठ्या भागीदारी करण्यावर भर देणे आवश्यक आहे. खेळाडूंनी एकमेकांना समजून घेतले तर सर्वकाही सुरळीत होते. गेल्या काही मालिकांमध्ये आम्ही संयम गमावित चुकीचे फटके खेळले. त्यामुळे आता संघ म्हणून कामगिरीत सुधारणा करावी लागेल.’
गोलंदाजीबाबत बोलताना विराट म्हणाला,‘मायदेशात फिरकीपटूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. वेगवान गोलंदाजही चांगली कामगिरी करीत आहेत. गेल्या काही लढतींमध्ये त्यांनी संघाला विजय मिळवून दिला आहे. विंडीजमध्ये रिव्हर्स स्विंगसाठी अनुकूल स्थिती असते. आमच्या गोलंदाजांची योजना बघता कर्णधार म्हणून माझा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळाली आहे.’
विंडीज दौरा निश्चितच भारतीय संघासाठी आव्हान आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर यष्टिरक्षकाची जागा भरून काढण्यासाठी विराटची स्पेशालिस्टला पसंती आहे.
विराट म्हणाला,‘संघात लोकेश राहुल व रिद्धिमान साहा यांच्या रूपाने दोन यष्टिरक्षक आहे, पण माझ्या मते रिद्धिमान स्पेशालिस्ट आहे. त्याच्या फलंदाजीमध्येही सुधारणा होत आहे. त्यामुळे माझी पहिली पसंती त्याला राहील.’
विंडीजला ‘क्लीन स्वीप’ दिला तर भारताला क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. याबाबत बोलताना विराट म्हणाला,‘क्रमवारीवर आमचे लक्ष नाही. आम्ही केवळ चांगला खेळ करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. क्रमवारीवर आपले नियंत्रण नसते. त्यात सातत्याने बदल होत असतो. मालिकेत चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असून प्रत्येक सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न राहील. आगामी सत्र कसोटी क्रिकेटसाठी महत्त्वाचे आहे. विंडीज दौºयाच्या निमित्ताने संघाला कामगिरीचे आकलन करण्याची संधी मिळणार आहे.’
दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरागमन करीत असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत बोलताना विराट म्हणाला,‘शमीला रिव्हर्स स्विंगची चांगली कल्पना आहे. त्याच्या पुनरागमनामुळे आनंद झाला. शमी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी उत्सुक असून विंडीजमधील वातावरण त्याच्यासाठी महत्त्वाचे ठरेल.’
कुंबळे यांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंमध्ये विजय मिळवण्यासाठी व चांगली कामगिरी करण्याची वेगळी इच्छा जागृत झाली असल्याचे सांगताना विराट म्हणाला,‘कुंबळे यांनी विपरीत परिस्थितीमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यांनी अशी कामगिरी केली असल्यामुळे आम्हालाही ते ही बाब चांगल्या पद्धतीने समजावून देऊ शकतात. या बाबतीत कुंबळे आणि मी सारखेच आहोत.’
विराट पुढे म्हणाला,‘चांगला प्रशिक्षक खेळाडूंना समजून घेतो आणि कुंबळे प्रत्येक खेळाडूंसोबत वेगवेगळी चर्चा करतात आणि त्यांना समजून घेतात. ते नेहमी खेळाडूंसोबत जुळलेले असतात.’