मानधनवाढीसाठी कुंबळेची शिफारस
By admin | Published: May 22, 2017 02:38 AM2017-05-22T02:38:30+5:302017-05-22T02:38:30+5:30
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांनी ‘अ’ श्रेणी खेळाडूंच्या तसेच सपोर्ट स्टाफच्या केंद्रीय कराराच्या मानधनात १५० टक्के वाढीची शिफारस केली आहे.
नवी दिल्ली : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांनी ‘अ’ श्रेणी खेळाडूंच्या तसेच सपोर्ट स्टाफच्या केंद्रीय कराराच्या मानधनात १५० टक्के वाढीची शिफारस केली आहे. हैदराबाद येथे प्रशासकीय समिती (सीओए) तसेच बीसीसीआयचे आधिकारी सीईओ राहुल जौहरी, संयुक्त सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांच्यापुढे अनिल कुंबळेने हा प्रस्ताव सादर केला. कर्णधार कोहली हा हैदराबाद येथे उपस्थित नव्हता. मात्र, त्याने स्काईपीद्वारे पॅनलपुढे आपले मत मांडले. सध्या ‘अ’ श्रेणी खेळाडूंना दोन कोटी, ‘ब’ श्रेणी खेळाडूंना एक कोटी आणि ‘क’ श्रेणी खेळाडूंना ५० लाख रुपये हे वार्षिक स्वरूपात मिळतात. सूत्रांनुसार, कुंबळे आणि कोहली या दोघांच्या मते ‘अ’ श्रेणी खेळाडूंना एका सत्रासाठी पाच कोटी रुपये मिळायला हवेत. विनोद राय आणि विक्रम लिमये यांनी कुंबळे आणि कोहलीची मते जाणून घेतली, या प्रस्तावावर बीसीसीआयचे पदाधिकारी गांभीर्याने विचार करतील. आता जौहरी, अमिताभ आणि अनिरुद्ध हे या प्रस्तावावर निर्णय घेतील. यासंबंधीचा अहवाल तयार करून तो सीओएकडे पाठविला जाईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय होईल. बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, की अनिल आणि विराट यांनी वेगवेगळी मते मांडली; परंतु कसोटी क्रिकेटला अधिक महत्त्व द्यायला पाहिजे, यावर दोघांचाही भर होता. सोबत चेतेश्वर पुजारासारख्या खेळाडूला आयपीएलचा करार मिळाला नाही. दुसरीकडे पवन नेगीसारखा
खेळाडू रणजी चषकातही खेळत नाही. त्याला ४५ दिवसांत ८.५ कोटी रुपये मिळतात. या तुलनात्मक गोष्टीवरही विचार व्हायला हवा.