टीम इंडियात सातत्याचा अभाव : व्यंकटराघवन
By admin | Published: February 6, 2015 02:10 AM2015-02-06T02:10:02+5:302015-02-06T02:10:02+5:30
विश्वचषकाआधी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे
चेन्नई : विश्वचषकाआधी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे. याशिवाय, सलामीच्या जोडीचा प्रश्न सुटलेला नाही, असे मत माजी भारतीय कर्णधार श्रीनिवास व्यंकटराघवन यांनी नोंदविले.
१९७५ आणि १९७९च्या विश्वषकात भारतीय संघाचे कर्णधार राहिलेले व्यंकटराघवन म्हणाले, ‘‘सध्याच्या संघात सातत्याचा अभाव आहे. आघाडीची आणि मधल्या फळीतील फलंदाजी, गोलंदाजीदेखील कमकुवत आहे. सातत्यपूर्ण कामगिरी ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते आणि भारतीय संघात नेमकी हीच बाब आढळत नाही. आघाडीच्या क्रमावर आमच्याकडे स्थिर संयोजन नाही. वन डे क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात करायची झाल्यास संयोजन मोलाचे ठरते.’’ त्यांनी धोनीच्या फलंदाजीचे आणि सकारात्मक वृत्तीचे कौतुक केले. कर्णधार हा प्रेरणादायी आणि अनुभवी असल्याचे सांगितले; पण गोलंदाजीची त्याला साथ लाभत नाही, याविषयी चिंता वर्तवली. गोलंदाजी चिंतेचा विषय असून आमचे आघाडीचे गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांपुढे टिकत नाहीत. शिवाय, क्षेत्ररक्षणही कुचकामी असते, असे सांगून त्यांनी १९८३च्या विश्वषकाच्या अंतिम सामन्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘कपिलच्या मिडविकेटवरील एका उत्कृष्ट झेलामुळे सामन्याचे चित्र पालटले. चांगले क्षेत्ररक्षण सामना फिरवू शकते; शिवाय गोलंदाजांनाही स्फूरण चढते, याचे तो सामना उत्तम उदाहरण ठरला.’’
आॅस्ट्रेलियात वन डेत फिरकी गोलंदाजी मोलाची भूमिका वठवेल. खेळपट्टीचा वेध घेत आम्ही दोन फिरकी गोलंदाजांसह खेळू शकतो. न्यूझीलंडमधील स्थिती वेगळी असेल. तेथे गवत असेल. तेथे वेगवान माऱ्याला वाव असल्याने ईशांत आणि भुवनेश्वर संघात असावेत. उपांत्य फेरी भारत गाठेलच. त्यासाठी विराट कोहली आणि रोहित यांनी मोठी खेळी करायलाच हवी, असेही व्यंकटराघवन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
आजचे खेळाडू स्वत:ला पूर्णपणे खेळात झोकून देत नाहीत, खेळाडू महत्त्वाकांक्षी आहेत आणि खेळण्यास उत्साही आहेत; पण मैदानावर कामगिरी करण्यात अपयशी ठरतात. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पंच राहिलेले एलिट पॅनलचे माजी सदस्य व्यंकटराघवन यांच्या मते भारत पहिल्या ४ संघांत स्थान मिळवू शकतो असे व्यंकटराघवन म्हणाले़