ललिता अॅथलेटिक्समध्ये इतिहास रचणार ?
By admin | Published: August 15, 2016 05:40 AM2016-08-15T05:40:10+5:302016-08-15T06:32:34+5:30
ललिता बाबर आज, सोमवारीे रिओ आॅलिम्पिकमध्ये जेव्हा महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेज फायनलमध्ये खेळण्यास उतरेल तेव्हा तिचे लक्ष नवीन इतिहास रचण्याकडे असणार
रिओ : महाराष्ट्राची महिला अॅथलिट ललिता बाबर आज, सोमवारीे रिओ आॅलिम्पिकमध्ये जेव्हा महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेज फायनलमध्ये खेळण्यास उतरेल तेव्हा तिचे लक्ष नवीन इतिहास रचण्याकडे असणार आहे.
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील २७ वर्षीय ललितासाठी पदक जिंकण्याचा मार्ग खडतर आहे; परंतु अशक्य मात्र नाही. ती १९८४ लॉस एंजिल्स आॅलिम्पिकमध्ये पी. टी. उषानंतर अॅथलेटिक्स फायनलसाठी पात्र ठरणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
ललिता १९.७६ सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमासह आपल्या हिटमध्ये चौथ्या स्थानी राहताना फायनलला पात्र ठरण्यात यशस्वी ठरली. ती सर्वच क्वॉलिफायरमध्ये सातव्या स्थानावर आली. तिच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर तिचे आई-वडील यांना महाराष्ट्राच्या मंदिरात जाऊन पूजा करताना दाखविले गेले आणि ती आज आपल्या कामगिरीत सुधारणा करू शकली तर ती अॅथलेटिक्समध्ये भारताची नवीन स्टार म्हणून पुढे येईल. आता ललिता उषाच्या कामगिरीत सुधारणा करू शकेल अथवा नाही हे पाहावे लागेल. पीटी उषाचे कांस्यपदक थोडक्यात हुकले होते. फायनलमध्ये ललिताला वर्ल्डचॅम्पियन, गत आॅलिम्पिक चॅम्पियन आणि हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या धावपटूंचे आव्हान असणार आहे.
गेल्या वर्षी बीजिंगमध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये ललिताच्या पुढे असणाऱ्या कमीत कमी पाच धावपटू फायनलमध्ये असणार आहेत. विश्व चॅम्पियनशिपमध्ये ललिताने ९ मिनिट २७.८६ सेकंद वेळ नोंदवताना आठवे स्थान मिळविले होते. आज, सोमवारी विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारात केनियात जन्मलेली आणि २0१३च्या बहरीनकडून खेळणारी रुथ जेबेट असेल. ती आठ मिनिट ५९.९७ सेकंदांसह हंगामात सर्वोत्तम कामगिरी करणारी खेळाडू आहे. २0१४ आशियाई क्रीडा स्पर्धेत जेबेट अपात्र ठरल्यानंतर ललिताला मिळालेल्या कांस्यपदकाचे रूपांतर रौप्यपदकात झाले होते.