ललिताची धाव पाहताना काळजाचा ठोका चुकला!

By Admin | Published: August 14, 2016 12:48 AM2016-08-14T00:48:23+5:302016-08-14T01:02:14+5:30

सातारकर झाले स्तब्ध : अंतिम फेरीत धडक मारल्याची बातमी पसरताच उधाण

Lalita's misery missed the pain! | ललिताची धाव पाहताना काळजाचा ठोका चुकला!

ललिताची धाव पाहताना काळजाचा ठोका चुकला!

googlenewsNext

म्हसवड/पळशी (जि.सातारा) : कधी चार स्पर्धक पुढे तर कधी पाच... कधी सात स्पर्धक पुढे तर कधी आठ.. मध्यंतरी सर्व स्पर्धकांना मागे टाकून प्रथम.. पुन्हा दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर झेप.. अशा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या रिओ आॅलिम्पिकच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या पात्रता फेरीत ‘सातारा एक्स्प्रेस’ ललिता बाबरने अखेर चौथा क्रमांक पटकावून थेट अंतिम फेरीत धडक मारली.
तिसऱ्या क्रमांकावर असणारी ललिता शेवटच्या काही क्षणात चौथ्या क्रमांकावर गेली. ललिताची ही धाव पाहताना सातारकरांच्या काळाजाचा ठोकाच चुकला. काही क्षणासाठी अवघा सातारा जिल्हा स्तब्ध झाला. मात्र, अंतिम फेरीत धडक मारल्याची बातमी पसरताच जिल्ह्यात उत्साहाला उधाण आले.
जिद्द व मेहनत करण्याचे बळ अंगात असले तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘माणदेशी एक्स्प्रेस’ ललिता बाबरने दाखवून दिले आहे. शनिवारी सायंकाळी सुरू झालेला सामना पाहताना लाखो सातारकरांच्या काळजाचा ठोका चुकला. अंतिम फेरीत प्रवेश झाल्यानंतर माणसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
‘माणदेशी एक्स्प्रेस’ ललिताने देशाला पदक मिळवून देऊन भारताचे, सातारा जिल्ह्याचे व माण तालुक्याचे नाव मोठे करावे, यासाठी माण तालुक्यातील जनतेच्या वतीने देवाकडे धावा केला जात असून, ललिताने सुवर्णपदक मिळवावे, असे जिल्हावासीयांबरोबरच देशवासीयांना आशा आहे.
ज्यावेळी ललिता धावण्यासाठी ट्रॅकवर आली तेव्हा तमाम सातारकरांच्या नजरा ललिताच्या कामगिरीकडे लागल्या. सुरुवातीची चार मिनिटे ललिता सहा ते सात स्पर्धकांच्या मागे होती. मात्र, यानंतर ती सर्वांच्या पुढे आहे.
ललिता अव्वल येणार अशी आशा असतानाच ती तिसऱ्या क्रमांकावर आली. शेवटचा राउंड सुरू झाल्यानंतर मात्र सर्वांच्याच उत्कंठा वाढल्या. प्रथम पाच स्पर्धकांमध्ये ललिताने चौथा क्रमांक पटकावून थेट अंतिम फेरीत धडक मारली. तिने हे अंतर केवळ ९ मिनिट १९.७६ सेकंदात पूर्ण केले.

शंभू महादेवाला साकडे
रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सहभागी झालेल्या ललिता बाबरने अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर ललिताच्या आई-वडिलांसह कुटुंबीय आणि शिंगणापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाला अभिषेक घालून ललिताला सुवर्णपदक मिळावे, असे साकडे घातले. आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळावे, यासाठी ललिताची आई निर्मला बाबर व वडील शिवाजी बाबर व आजपर्यंत तिला प्रत्येक अडचणीत साथ देत आलेले तिचे काका गणेश बाबर तसेच ज्यांनी तिला खेळाचे धडे दिले व राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत स्वत: तिच्या बरोबर जाऊन तिला सहकार्य केले ते कन्या विद्यालयातील क्रीडा गुरू भारत चव्हाण, वनिता चव्हाण तसेच तिला प्रत्येकवेळी सहकार्य करत आलेले वीरभद्र्र कावडे व शिंगणापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ या सर्वांनी मिळून शंभू महादेवाला अभिषेक घातला. ललिताच्या कामगिरीमुळे ललिताच्या मोही या गावी आनंदाचे वातावरण असून, ललिता अंतिम फेरीही जिंकणारच, असा विश्वास बाबर कुटुंबीयांनी व्यक्त केला.


अंतिम स्पर्धेत धडक मारल्यानंतर ललिता बाबर हिच्या आई-वडिलांसह कुटुंबीय व ग्रामस्थांनी शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाला ललिताच्या विजयासाठी साकडे घातले.

Web Title: Lalita's misery missed the pain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.