लंकेने भारताला लोळविले
By admin | Published: February 10, 2016 03:50 AM2016-02-10T03:50:07+5:302016-02-10T03:50:07+5:30
आॅस्ट्रेलिया विजय मिळवून आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच टी-टष्ट्वेन्टी सामन्यात श्रीलंकेने धूळ चारत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. गोलंदाजी व फलंदाजीत
- विशाल शिर्के, पुणे
आॅस्ट्रेलिया विजय मिळवून आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच टी-टष्ट्वेन्टी सामन्यात श्रीलंकेने धूळ चारत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. गोलंदाजी व फलंदाजीत सरस कामगिरी करीत भारतावर ५ गडी राखून विजय मिळविला. दसून शनाका व सामनावीर कसून रजिथा विजयाचे शिल्पकार ठरले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवित भारताला १०१ धावांत गुंडाळले.
विजयासाठीचे हे माफक आव्हान लंकेने १८ षटकांत ५ बाद १०५ धावा करीत पार केले. निरोशन डिकवेला (४), दनुश्का गुणतिलके (९) या सलामीच्या जोडीला आशिष नेहराने झटपट बाद करीत श्रीलंकेला झटका दिला. त्यानंतर कर्णधार चंडीमल व चामरा कापूदेगरा या जोडीने तिसऱ्या बळीसाठी ३९ धावांची भागीदारी केली. चंडीमलने ३५ चेंडूत १ चौकार व २ षटकाराच्या सहाय्याने ३५ धावा फटकावल्या. तर कापूदेगराने २६ चेंडूत ४ चौकाराच्या सहाय्याने २५ धावा टोलावल्या. आश्विनने कापूदेगराला बाद करीत श्रीलंकेला तिसरा झटका दिला. त्यावेळी श्रीलंकेच्या ११.३ षटकांत ३ बाद ६२ धावा झाल्या होत्या.
त्यानंतर चंडीमल व शनाका (३) पाठोपाठ बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था ४ बाद ८४ वरुन ५ बाद ९४ अशी झाली. मात्र तोपर्यंत विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक होती. मिलिंदा श्रीवर्धने याने १४ चेंडूत २ चौकार व १ षटकाराच्या सहाय्याने २१ धावा फटकावित संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सेकुगे प्रसन्ना ३ धावांवर नाबाद राहिला. चंडीमलला रैनाने तर कापूदेगराला आश्विनने पायचीत केले.
तत्पूर्वी कसुन रजिथा याने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवित सलामीची जोडी तंबुत धाडली. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर सलामीवीर रोहित शर्माने टोलावलेला चेंडू दुशमंथा चमीरा याने हवेत सूर घेत टिपला. पाठोपाठ अजिंक्य रहाणे
(४ चेंडूत ४ धावा) याने मारलेल्या फटक्यावर उसळी मारलेला चेंडू कर्णधार दिनेश चंडीमल याने पुढे सरसावत सुरेख झेल घेत दुसरा झटका दिला. पहिल्या षटकांत २ बाद ५ अशी अवस्था झाली. नंतर शिखर धवन (१३ चेंडूत ९ धावा), सुरेश रैना (२० चेंडूत २०) व पाठोपाठ कर्णधार महेंद्रसिंह धोनी (२) बाद झाल्याने भारताची अवस्था ५ बाद ५१ झाली. पुढच्याच षटकात युवराज (१४ चेंडूत १०) चामिराच्या चेंडूवर एका खराब फटक्यावर त्याच्याकडेच झेल देऊन परतला. पाठोपाठच्या हार्दिक पंड्या (२) नंतर रवींद्र जडेजा (९ चेंडूत ६) बाद झाला. त्यामुळे शंभरीच्या आत भारताचे पानिपत होईल असे वाटत होते. मात्र आर. आश्विनने नाईटवॉचमनची भूमिका बजावत नेहराच्या साथीत संघाला शंभरी पार करून दिली. आश्विनने ५ चौकाराच्या सहाय्याने २४ चेंडूत ३१ धावांची खेळी करीत संघाला शंभरी पार नेले.
आकडे बोलतात..
टी-२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेने चौथ्यांदा भारतीय संघाला हरविले. भारत-श्रीलंका यांच्यातील हा सातवा टी-२० सामना होता.
१०१ ही भारताची श्रीलंकेविरुद्धची टी-२०तील निचांकी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २०१४मध्ये ढाक्यात श्रीलंकेने भारतीय संघाला ४ बाद १३० धावांवर रोखले होते.
टी-टष्ट्वेन्टीत भारताची १०१ ही तिसरया क्रमांकाची निचांकी धावसंख्या ठरली आहे. मेलबर्नला २००८मध्ये आॅस्ट्रेलियाने भारतीय संघाला ७४ धावांत गुंडाळले होते, तर कटकला २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेने ९२ धावांत रोखले होते.
धावफलक :
भारत : रोहित शर्मा झे. चामिरा गो. रजिथा ०, शिखर धवन झे. गुनातिलाका गो. रजिथा ४, अजिंक्य रहाणे झे. चंदिमल गो. रजिथा ४, सुरेश रैना त्रि. गो. शनाका २०, युवराज सिंग झे. गो. चामिरा १०, महेंद्रसिंह धोनी झे. डिकवेला गो. शनाका २, हार्दिक पांड्या
पायचीत गो. शनाका २, रवींद्र जडेजा पायचित गो. सेनानायके ६, आर. आश्विन नाबाद ३१, आशिष नेहरा झे. श्रीवर्धना गो. चामिरा ६, जसप्रित बुमराह धावबाद रजिथा/चंदिमल ०; अवांतर : ११; एकूण : १८.५ षटकांत सर्व बाद १०१, गडी बाद होण्याचा क्रम : १/०, २/५, ३/३२, ४/४९, ५/५१, ६/५३, ७/५८, ८/७२,९/१००,१०/१०१; गोलंदाजी : कासुन रजिथा ४-०-२९-३, थिसारा परेरा ३-१-१०-०, सचित्रा सेनानायके ३-०-१८-१, दुशमंथा चामिरा ३.५-०-१४-२, दसुन शनाका ३-०-१६-३, सेकुगे प्रसन्ना २-०-११-०.
श्रीलंका : निरोशन डिकवेल झे. धवन गो. नेहरा ४, धनुषा गुनातिलाका झे. धवन गो. नेहरा ९, दिनेश चंदिमल पायचित गो. रैना ३५, चामरा कापूदेगरा पायचित गो. आश्विन २५, मिलिंदा सिरीवर्धना नाबाद २१, दसुन शनाका झे. रैना गो. आश्विन ३, सेकुगे प्रसन्ना नाबाद ३; अवांतर : ५; एकूण : १८ षटकांत ५ बाद १०५; गडी बाद होण्याचा क्रम १/४, २/२३, ३/६२, ४/८४, ५/९१, गोलंदाजी आशिष नेहरा ३-०-२१-२, जसप्रित बुमराह ४-१-१९-०, रवींद्र जडेजा ३-०-१८-०, हार्दिक पांड्या ३-०-१८-०, आर. आश्विन ३-०-१३-२, सुरेश रैना २-०-१३-१.