मेलबोर्नमध्ये अखेरची संधी
By admin | Published: December 23, 2014 02:08 AM2014-12-23T02:08:05+5:302014-12-23T02:08:05+5:30
आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना गमावल्यानंतर मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर भारतीय संघ तिस-या कसोटी सामन्यात सरशी
मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना गमावल्यानंतर मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात सरशी साधत आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलग सातवा पराभव टाळण्यासाठी व मालिका बरोबरीत सोडविण्याची आशा कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. २००८ मध्ये भारताने अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली आॅस्ट्रेलियाचा पर्थ कसोटी सामन्यात पराभव करीत मालिकेत २-० ने विजय मिळविला होता. त्यानंतर उभय संघांना भारत व आॅस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आली नाही. भारताला २०११-१२ मध्ये खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर या मालिकेतही सलग दोन सामने गमावणाऱ्या भारतीय संघावर सलग सातव्यांदा पराभव स्वीकारण्याचे संकट घोंघावत आहे.
मेलबोर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियन संघ संतुलित भासत नाही. अंगठ्याच्या दुखापतीमुळे सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. शेन वॉटसन व ब्रॅड हॅडिन यांना या मालिकेत अद्याप सूर गवसलेला नाही. दुसऱ्या कसोटीत दुखापतग्रस्त झालेल्या मिशेल मार्शच्या स्थानी युवा खेळाडू जो बर्न्सचा समावेश करण्यात आलेला आहे. कर्णधार स्टिव्ह स्मिथ व मिशेल जॉन्सन यांचा फॉर्म संघासाठी दिलासा देणारी बाब आहे, तर वेगवान गोलंदाज रेयॉन हॅरिस दुखापतीतून सावरलेला आहे. जॉन्सन व हेजलवूड यांची साथ देण्या तो सज्ज आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता भारतीय संघ समतोल भासत आहे. भारतीय गोलंदाज फॉर्मात असून, दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजांचे अपयश संघासाठी चिंतेचा विषय आहे. (वृत्तसंस्था)