अखेरचे निर्धाव षटक, पुण्याचा विजय
By admin | Published: May 7, 2017 05:30 AM2017-05-07T05:30:30+5:302017-05-07T05:30:30+5:30
आयपीएल सामन्यातील अखेरचे षटक म्हटले म्हणजे त्यावर फलंदाजाची हुकुमत असणार, हे सहाजीकच मानले जाते. मात्र, पुणे सुपरजायंट्सच्या जयदेव
आकाश नेवे/आॅनलाइन लोकमत
आयपीएल सामन्यातील अखेरचे षटक म्हटले म्हणजे त्यावर फलंदाजाची हुकुमत असणार, हे सहाजीकच मानले जाते. मात्र, पुणे सुपरजायंट्सच्या जयदेव उनाडकट याने आयपीएलच्या इतिहासात आज अनोखी कामगिरी नोंदवली. अखेरच्या षटकांत
त्याने हॅट्ट्रिक घेत संपूर्ण षटक निर्धाव टाकले. अखेरचे षटक निर्धाव टाकण्याची अनोखी कामगिरी जयदेव उनाडकटने केली. त्यासोबतच त्याने आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा पाच बळी मिळवले, तसेच स्पर्धेत १०० बळी घेण्याच्या विक्रमालाही गवसणी घातली.
सनरायजर्स हैदराबाद विरोधातील या सामन्यात पुण्याच्या संघाने १४८ धावा केल्या, हे लक्ष्य हैदराबादच्या धुरंधरांसाठी तसे फारसे कठीण नव्हते. मात्र, स्टोक्सने धवन, वॉर्नर आणि केन विल्यम्सला बाद करत हैदराबादला धक्के दिले. ताहीरने हेन्रीक्सला बाद केले, त्यानंतर खेळपट्टीवर सुरू झाला तो जयदेव उनाडकटचा खास शो! जयदेवने ४७ धावा करणाऱ्या युवराजला बाद करत हैदराबादच्या आशांना सुरूंग लावला. यष्टीरक्षक नमन ओझाही त्याचाच बळी ठरला. अखेरच्या षटकांत हैदराबादला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती, हे लक्ष्य आयपीएलमध्ये तसे सोपे मानले जाते. या षटकातल्या पहिल्याच चेंडूूवर धाव घेणे विपुल शर्माला जमले नाही. दुसऱ्या चेंडूवर अगतिक झालेल्या विपुलने फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि स्टोक्सने सहज घेतला. तिसऱ्या चेंडूवर युवा रशीद खाननेही पुन्हा तीच चूक केली. या वेळी उनाडकटने स्वत:च झेल घेत त्याला तंबूत पाठवले. चौथ्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारला
बाद करत आपली हॅट्ट्रिक आणि संघाचा विजय साकारला. अखेरचे दोन चेंडूही निर्धाव टाकत उनाडकटने डेथ ओव्हरमधले षटक निर्धाव टाकण्याची कामगिरी केली.
या सामन्यात पाच बळी घेतल्यानंतर आॅरेंज कॅपच्या शर्यतीत उनाडकटने तिसरे स्थान गाठले असून त्याने १२ सामन्यांत १७ गडी बाद केले. त्याच्या पुढे इम्रान ताहीर (१८ बळी) आणि भुवनेश्वर कुमार (२१ बळी) हे आहेत. या विजयाने गुणतक्त्यात पुणे सुपरजायंट्सने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पुण्याने १२ सामन्यांत ८ विजयांसह १६ गुणांची कमाई केली आहे. उर्वरित दोन सामन्यांपैकी एक विजयही पुण्याला प्लेआॅफपर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो. पुण्याला पुढचे दोन सामने प्ले आॅफसाठी झगडणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब विरोधात खेळायचे आहेत.