दालमियांना अखेरचा निरोप
By admin | Published: September 21, 2015 11:55 PM2015-09-21T23:55:27+5:302015-09-21T23:55:27+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यावर सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यावर सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, आयसीसीचे प्रमुख श्रीनिवासन, अनुराग ठाकूर, शशांक मनोहर, रवी शास्त्री, सौरव गांगुली यांनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
हृदयविकाराच्या झटक्याने दालमिया यांचे रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात निधान झाले. भारतीय क्रिकेटला वैभवाचे दिवस दाखविणाऱ्या दालमिया यांना अखेरचा निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. सोमवारी दुपारी १ च्या सुमारास त्यांचे पार्थिव ईडन गार्डन मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुलगा अभिषेक, मुलगी वैशाली व पत्नी चंद्रलेखा व नातेवाईक या वेळी उपस्थित होते. बंगालच्या मुख्यमंत्र्यांसह क्रिकेट संघातील आजीमाजी खेळाडू यांनी त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांचे पार्थिवावर केवडातला स्मशानात अंतिम संस्कार करण्यात आले.
क्रीडा प्रशासनामध्ये मोठे स्थान : ममता
कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनाने शोक व्यक्त करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी क्रीडा प्रशासकांमध्ये त्यांचे स्थान खूप मोठे असल्याचे सांगितले.
ममता बॅनर्जी यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया दिली की, दालमिया आता आपल्यात नाहीत, यामुळे मी अत्यंत दु:खी आहे. ते बंगालवर खूप प्रेम करणारे होते. क्रीडा प्रशासक म्हणून त्यांचा दर्जा खूप उच्च आहे. त्यांच्या निधनामुळे क्रीडा क्षेत्रात एक कधीही न भरून येणारे रिक्त पद तयार झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या व मित्र परिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्मास शांती मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
दालमिया यांचे मरणोत्तर नेत्रदान
बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे डोळे मृत्यूनंतर सुश्रुत आय फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या वनमुक्त आय बँकेला दान करण्यात आले. बीसीसीआयने स्पष्ट केले, की दालमिया यांनी नेत्रहीनता संपुष्टात आणण्यासाठी जुळलेल्या सामाजिक कल्याण कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ही थीम ‘क्रिकेट फॉर लाईफ बीयाँड डेथ’ आणि ‘चान्स फॉर सेकंड इनिंग्ज’ या नावानेही ओळखली जाते.
दालमियांनी भारताला क्रिकेटचे घर बनवले : जेटली
नवी दिल्ली : बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया हे महान प्रशासक असल्याचे सांगताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दालमिया यांच्या निधनाने देशाने उत्साही प्रशासक गमावला आहे, ज्याने भारताला क्रिकेटचे घर बनवले आहे. आपण आपला एक मित्र गमावला आहे,
असे हाँगकाँग येथून आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
दालमिया यांची उणीव भासेल : गावसकर
नवी दिल्ली : दालमिया म्हणजे क्रिकेटमध्ये सर्व बाबींना महत्त्व देणारी व्यक्ती, अशा शब्दांत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी दालमिया यांना श्रद्धांजली अर्पण केली. दिग्गज सलामीवीर गावस्कर यांचे दालमिया यांच्यासोबत सलोख्याचे संबंध होते. गावसकर म्हणाले,‘‘मला त्यांच्या खळखळून हसण्याच्या शैलीची उणीव भासेल. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो.’’(वृत्तसंस्था)
दालमिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे व्यक्तिमत्त्व होते. दालमिया यांच्या प्रयत्नांमुळेच बीसीसीआय व आयसीसीची आर्थिक बाजू मजबूत झाली. आय. एस. बिंद्रांच्या साथीने त्यांनी
भारतीय क्रिकेटची क्षमता व विकासासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाची
भूमिका ओळखली. आयसीसीकडे सुरुवातीला काही हजार डॉलर्स असायचे, पण दालमियांच्या नेतृत्वामुळे त्यांच्याकडे आज
कोट्यवधीची संपत्ती आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला विशेषत: भारतीय क्रिकेटला अनेकदा अडचणीच्या स्थितीतून बाहेर काढण्यास
मदत केली.
- सुनील गावसकर
आयसीसीने
व्यक्त केला शोक
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. दालमिया १९९७ ते २००० या कालावधीत आयसीसीचे अध्यक्ष होते. दालमियांचे कुटुंब, मित्र आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांना लिहिलेल्या पत्रात आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांनी म्हटले आहे, की क्रिकेटला दिलेल्या वैयक्तिक योगदानासाठी दालमिया प्रदीर्घ काळ आठवणीत राहतील. दालमिया यांच्या निधनामुळे मला दु:ख झाले. ते चांगले क्रिकेट प्रशासक होते.
शरद पवार : मी जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे दु:खी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषविणारे विकसनशील देशातील पहिले व्यक्ती म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. त्यांनी बीसीसीआयला क्रीडाक्षेत्रात बलाढ्य व प्रभावी क्रिकेट संस्था म्हणून ओळख निर्माण करून दिली. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो.
महेंद्रसिंह धोनी : दालमिया यांनी क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाला सलाम. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.’
विराट कोहली : दालमिया यांच्या निधनाच्या वृत्तामुळे दु:ख झाले. त्यांचे कुटुंबीय व मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एसी मुथय्या : दालमिया शानदार व्यक्तिमत्त्वाचे स्वामी होते. त्यांनी आयसीसीला एमसीसीच्या जोखडातून मुक्त केले. त्यांचे विपणन कौशल्य व हुशारीमुळे आयसीसी व सदस्य देशांना आर्थिक लाभ झाला.
ईशांत शर्मा : दालमिया यांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. बीसीसीआयमध्ये दालमिया यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.’
अजिंक्य रहाणे : ‘दालमिया यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.’
झहीर खान : दालमिया यांच्या निधनामुळे दु:ख झाले. ईश्वर त्यांच्या कुटुंबीय व मित्रांना हा आघात सहन करण्याची शक्ती प्रदान करो.’
भाजप अध्यक्ष अमित शहा : ‘दालमिया यांच्या निधनामुळे केवळ भारतीय क्रिकेटच नाही तर विश्व क्रिकेटचे मोठे नुकसान झाले.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष सी. के. खन्ना : ‘जगमोहन दालमिया कुशल प्रशासक व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रिकेटची मोठी हानी झाली.