गत उपविजेत्या सचिनचा धक्कादायक पराभव

By Admin | Published: January 9, 2016 03:29 AM2016-01-09T03:29:29+5:302016-01-09T03:29:29+5:30

गत उपमहाराष्ट्र केसरी पुणे जिल्हा संघाचा सचिन येळभर याचा खळबळजनक पराभव मानाच्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीचे वैशिष्ट्य ठरले.

Last runner-up Sachin Tendulkar's shocking defeat | गत उपविजेत्या सचिनचा धक्कादायक पराभव

गत उपविजेत्या सचिनचा धक्कादायक पराभव

googlenewsNext

नागपूर : गत उपमहाराष्ट्र केसरी पुणे जिल्हा संघाचा सचिन येळभर याचा खळबळजनक पराभव मानाच्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीचे वैशिष्ट्य ठरले. चिटणीस पार्कमध्ये सुरू असलेल्या रोमहर्षक लढतींमध्ये सकाळच्या सत्रात बीडचा गोकूळ आवारे याने सचिनला तीन विरुद्ध दोन अशा गुणांनी धूळ चारून पराभवाची चव चाखविली.
मातीच्या आखाड्यात ५७ किलो वजन गटात सोलापूर जिल्ह्याचा ज्योतिबा अटकळे नवा विजेता बनला. त्याला लातूरच्या शरद पवारने अंतिम लढतीत पुढे चाल दिली. त्याआधी उपांत्य लढतीत गतविजेता सागर मारकड(पुणे जिल्हा)याला गतउपविजेता शरद पवार याने अत्यंत चुरशीच्या लढतीत प्रत्येकी पाच गुणानंतर कलात्मक डावाच्या आधारे सागरला नमवित गत पराभवाची परतफेड केली.
दुसरीकडे गतविजेता विजय चौधरी, राहुल खानेकर, सचिन मोहोळ, विष्णू खोसे, विक्रांत जाधव, महादेव सरगर, समाधान पाटील, गोकूळ आवारे, विजय धुमाळ, योगेश पवार, बाला रफिक शेख, किरण भगत, विलास डोईफोडे यांनी तिसऱ्या फेरीत विजय नोंदवित चौथी फेरी गाठली. किताबाच्या अंतिम फेरीत कोण कायम राहणार, हे आज शनिवारी ठरणार आहे.
माती विभागात जळगावचा विजय चौधरी याने तिसऱ्या फेरीत सुरुवातीला दोन गुणांची आघाडी घेणाऱ्या सांगलीचा अण्णा कुवळेकरचा ‘गदालोट’ हा हुकमी डाव मारून पहिल्या तीन मिनिटांत चितपटद्वारे विजय नोंदविला. बीडचा गोकूळ आवारे याने मुंबई उपनगरच्या संकेत जांभुळकरचा पहिल्या तीन मिनिटांत पराभव केला. उस्मानाबादच्या विजय धुमाळने कल्याणचा गुरू भोईर याला चित करीत विजय नोंदविला.
नगरच्या योगेश पवारने ठाणे जिल्ह्याच्या भीमा पाटीलवर अवघ्या दहा सेकंदात सरशी साधली. सोलापूरच्या बाला रफिक शेख याने पिंपरी- चिंचवडचा प्रमोद मांडेकर याला तांत्रिक गुणांवर नमविले. औरंगाबाद जिल्ह्याचा शकील पठाण याने नाशिक शहरचा नवनाथ मते याचे आव्हान संपविले. गादी विभागात तिसऱ्या फेरीच्या सामन्यात पुणे जिल्हा संघाचा राहुल खणेकर याने नाशिकचा गौरव गणोरे याला २० सेकंदात चित केले. नागपूरचा रामचंद्र यंगळ हा उस्मानाबादचा दत्ता खणके याच्याकडून ०-१० गुणांनी पराभूत झाला. पुणे शहरचा महेश मोहोड याने साताऱ्याचा नीलेश लोखंडे याने १५ सेकंदात दहा गुणांनी तांत्रिक आधारे नमविले. ठाणे जिल्ह्याचा अनंत मडवी याने ठाणे शहरचा दीपक वदक याचा चितपटद्वारे पराभव केला. कोल्हापूरच्या समीर देसाईने मुंबईच्या विक्रांत जाधवचा १०-० ने तांत्रिक आधारे पराभव केला.
त्याआधी, ७४ किलो गादी गटात नगरचा केवल भिंगारे सुवर्णविजेता ठरला. त्याने सोलापूरचा नितीन भगत याला चारी मुंड्या चित केले. औरंगाबाद शहरचा नवनाथ औताडे व कोल्हापूरचा ऋषिकेश यांना कांस्य मिळाले.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Last runner-up Sachin Tendulkar's shocking defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.