‘बचपन का प्यार’साठी तिनं लाथाडलं सर्वोच्च पद !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 06:21 AM2022-03-29T06:21:56+5:302022-03-29T06:25:01+5:30

ॲश्ले म्हणते, टेनिस हे माझं स्वप्न होतंच, पण त्याशिवाय लहानपणापासून अनेक सुंदर स्वप्नं मी पाहिली होती, पाहते आहे, त्या स्वप्नांमध्ये आता मला रमायचं आहे.

Lathadlam top post for 'Bachpan Ka Pyaar'! Ashley Barty | ‘बचपन का प्यार’साठी तिनं लाथाडलं सर्वोच्च पद !

‘बचपन का प्यार’साठी तिनं लाथाडलं सर्वोच्च पद !

googlenewsNext

कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना, करिअरमध्ये अजून खूप काही बाकी असताना एखाद्यानं किंवा एखादीनं कोणाच्याही ध्यानीमनी नसताना वयाच्या २५ व्या वर्षीच आपल्या करिअरला कायमचा रामराम ठोकावा, यामागे कमालीचं धैर्य आणि आत्मविश्वास लागतो. हे धैर्य आणि हा आत्मविश्वास दाखवला आहे, जागतिक पातळीवर सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या २५ वर्षीय ऑस्ट्रेलियन टेनिस सुंदरी ॲश्ले बार्टी हिनं. आपल्या टेनिस करिअरची आपण समाप्ती करीत असल्याची अचानक घोषणा जेव्हा तिनं केली, तेव्हा अख्ख्या जगानं आश्चर्यानं तोंडात बोटं घातली. तिच्या चाहत्यांना तर अक्षरश: रडू कोसळलं.. पण, ॲश्ले बार्टीनं का करावं असं? पुढचे अनेक विक्रम तिला खुणावत असताना, ऐन भरात असताना, ती खेळत असताना आणि तिनं खेळल्यामुळे पैशांच्या राशी आपोआपच तयार होत असताना, कुबेर तिच्या घरात पाणी भरत असताना, का तिनं खेळाच्या मैदानापासून, आपल्या प्रेमापासून दूर व्हावं?..

ॲश्ले म्हणते, टेनिस हे माझं स्वप्न होतंच, पण त्याशिवाय लहानपणापासून अनेक सुंदर स्वप्नं मी पाहिली होती, पाहते आहे, त्या स्वप्नांमध्ये आता मला रमायचं आहे. ती स्वप्नं मला पूर्ण करायची आहेत. ‘या स्वप्नांसाठी मला वेळच मिळाला नाही, अशी हुरहुर नंतर वाटू नये’ म्हणून  टेनिस पासून मी दूर होते आहे.. - किती हिंमत लागते असं म्हणायला आणि करायलाही.. पण, ॲश्लेनं ते करुन दाखवलं आहे. कारण जगण्यावर आणि जगातल्या अनेक गोष्टींवर तिचं मन:पूत प्रेम आहे. ॲश्लेनं २०१९ मध्ये फ्रेंच ओपनचं विजेतेपद पटकावताना आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रॅण्ड स्लॅम खिशात घातलं. त्यानंतर तिने विजेतेपदांचा धडाका लावताना मागे वळून पाहिलं नाही. गेल्याच महिन्यांत तिने ऑस्ट्रेलियन ओपनचा विजयी चषक उंचावताना आपल्या कारकिर्दीचा कळस गाठला. गेल्या ४४ वर्षांत कोणत्याही ऑस्ट्रेलियन पुरुष किंवा महिला टेनिसपटूनं घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद मिळविण्याची ही पहिलीच घटना आहे. या कालावधीत सलगपणे ११४ आठवडे जागतिक क्रमवारीत ती अव्वल स्थानी होती.. याआधी यापेक्षा सरस कामगिरी फक्त चार महिला टेनिसपटूंनाच करता आली आहे. त्यातली एक आहे स्टेफी ग्राफ, दुसरी सेरेना विल्यम्स, तिसरी मार्टिना नवरातिलोवा आणि चौथी जस्टिन हेनिन. 

स्टेफी ग्राफ आणि सेरेना विल्यम्स या दोघींनी १८६ आठवडे, मार्टिनानं १५६ आठवडे तर, जस्टिन हेनिननं ११७ आठवडे सलगपणे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान राखलं होतं. करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना ॲश्लेनं टेनिस निवृत्तीची घोषणा केली असली, तरी याआधी आठ वर्षांपूर्वी टिनएजर असतानाही तिनं काही काळ टेनिसमधून ब्रेक घेतला होता आणि क्रिकेटची बॅट हातात धरली होती. २०१४ साली टेनिसची रॅकेट सोडून क्रिकेटची बॅट हातात घेताना क्रिकेटच्या ‘बिग बॅश’ लिग स्पर्धेत तिनं चमकदार कामगिरी केली होती. महिला राष्ट्रीय लीग क्रिकेट स्पर्धेत क्विन्सलँड संघाकडून खेळताना धमाकेदार शतकही झळकवलं होतं. आपण टेनिसमधून ब्रेक का घेत आहोत, हे तिनं त्यावेळीही जाहीर केलं नव्हतं, पण, आपल्या ‘बचपन के प्यार के लिए’ टेनिस काही काळ बाजूला ठेवून आपल्या स्वप्नांच्या जगात ती रमली होती. त्या काळात ती क्रिकेट तर खेळलीच, पण, गोेल्फ, फिशिंग, घर सजवणं.. या आपल्या आवडत्या गोष्टींसाठीही तिनं बराच वेळ दिला. 

१८ महिने ती टेनिसपासून दूर होती. ब्रेकनंतर टेनिसमध्ये ती परतली, त्यावेळी तिनं म्हटलं होतं, वयाच्या चौथ्या वर्षापासून मी टेनिस खेळते आहे. वयाच्या १५ व्या वर्षी मी विम्बल्डन ज्युनिअरचा किताब पटकावला होता. त्यानंतर आणखी चांगल्या कामगिरीसाठी माझ्यावरचा मानसिक दबाव प्रचंड वाढला होता. त्यासाठी मला थोडा वेळ हवा होता. लहानपणीच मी इतकं प्रचंड खेळले की, नंतर त्यातला आनंद घेणं मला अवघड झालं होतं. एक टिनएजर म्हणून जीवनाच्या इतर अंगांचाही आनंद मला घ्यायचा होता, सर्वसामान्य अनुभवांसाठी मी आसुसले होते.. त्यामुळे मी काही काळ टेनिस रॅकेट बाजूला ठेवली होती..

पैसा, सुख लाथाडणारी ॲश्ले एकटी नव्हे
ॲश्लेनं पुन्हा एकदा टेनिसची रॅकेट खाली ठेवली आहे पण, ही रॅकेट ती आता पुन्हा उचलण्याची शक्यता तशी कमीच आहे. कारण ती अतिशय जिद्दी आहे आणि मनासारखं जगण्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी आहे. पण, तिच्यासारख्या आणखीही काहीजणी आहेत, ज्यांनी पैसा आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच आपल्या कारकिर्दीला विराम दिला होता.  सिमोन बाइल्स या जगप्रसिद्ध जिमनॅस्टनं मानसिक आरोग्यावर लक्ष देण्यासाठी थेट ऑलिम्पिक स्पर्धा मध्येच सोडून दिली होती. सर्वश्रेष्ठ महिला गोल्फपटू म्हणून प्रसिद्ध असलेली स्वीडिश खेळाडू एनिका सोरेनस्टामनं आयुष्यातलं नवेपण शोधण्यासाठी टॉपला असलेलं आपलं करिअर बाजूला ठेवलं होतं. बेल्जियमची सात ग्रँड स्लॅम विजेती टेनिस खेळाडू जस्टिन हेनिनही ‘तेच ते’ करुन कंटाळली आणि नवे पर्याय शोधायला थेट मैदानाबाहेर पडली होती...

Web Title: Lathadlam top post for 'Bachpan Ka Pyaar'! Ashley Barty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.