लॅथमचे दमदार शतक
By admin | Published: January 16, 2017 05:29 AM2017-01-16T05:29:53+5:302017-01-16T05:29:53+5:30
न्यूझीलंडने दमदार पुनरागमन करताना रविवारी चौथ्या दिवशी पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचे दुसऱ्या डावात तीन बळी घेत रंगत कायम राखली.
वेलिंग्टन : टॉम लॅथमच्या (१७७) शतकी खेळीनंतर न्यूझीलंडने दमदार पुनरागमन करताना रविवारी चौथ्या दिवशी पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचे दुसऱ्या डावात तीन बळी घेत रंगत कायम राखली.
न्यूझीलंडविरुद्ध पहिला विजय मिळविण्यास प्रयत्नशील असलेल्या बांगलादेशने चौथ्या दिवस अखेर दुसऱ्या डावात ३ बाद ६६ धावांची मजल मारली. बांगलादेशकडे एकूण १२२ धावांची आघाडी असून, त्यांच्या सहा विकेट शिल्लक आहेत. कारण त्यांचा सलामीवीर इमरुल कायेस रिटायर्ड हर्ट झालो. सामना अनिर्णीत संपण्याची शक्यता अधिक आहे; पण उभय संघ निकालासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी बांगलादेशला दुसरा डाव घोषित करावा लागेल.
न्यूझीलंडने पहिल्या डावात ५३९ धावांची मजल मारली. बांगलादेशने पहिल्या डावात ५६ धावांची आघाडी घेतली आहे. रविवारी चौथ्या दिवशीचा खेळ थांबला त्यावेळी मोमिनुल हक (१०) खेळपट्टीवर होता. तमिम इक्बलाने २५ धावांची खेळी केली आणि इमरुल एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला. त्याने २४ धावा केल्या.
न्यूझीलंडने चौथ्या दिवशी ३ बाद २९२ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. सलामीवीर लॅथमने १७७ धावांची खेळी करीत संघावर फॉलोआॅनची नामुष्की ओढवणार नाही, हे निश्चित केले. बी. जी. वॉटलिंग (४९) व मिशेल सँटनर (७३) यांनी सातव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर सँटनर व बोल्ट (नाबाद ४) यांनी अखेरच्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी करीत बांगलादेशच्या गोलंदाजांना झुंजविले. (वृत्तसंस्था)