जागतिक कुस्ती स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात लातूरचा शैलेश ठोठावणार दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 08:49 PM2023-08-25T20:49:59+5:302023-08-25T20:50:13+5:30

सर्व्हियात होणार सिनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप

Latur's Shailesh Shelke selected in Indian squad for Senior World Championship | जागतिक कुस्ती स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात लातूरचा शैलेश ठोठावणार दंड

जागतिक कुस्ती स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात लातूरचा शैलेश ठोठावणार दंड

googlenewsNext

महेश पाळणे

लातूर : बलदंड शरीरयष्टी तसेच सालतू व भारंदाज डावाने प्रतिस्पर्धी मल्लांना अस्मान दाखविणाऱ्या लातूरच्या शैलेश शेळकेने कुस्ती खेळात पुन्हा मैदान मारले असून सर्व्हिया देशातील बेलग्रेड येथे होणाऱ्या सिनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.

मुळचा औसा तालुक्यातील टाका येथील असलेल्या उपमहाराष्ट्र केसरी शैलेश राजेंद्र शेळकेने पंजाब राज्यातील पतियाळा येथे शुक्रवारी झालेल्या भारतीय संघाच्या निवड चाचणी स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात जोरदार प्रदर्शन करीत भारतीय वरिष्ठ संघात जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी आपली निवड ग्रीकोरोमन प्रकारात पक्की केली आहे. या निवड चाचणीत शैलेशने युपीच्या सिध्दार्थ यादवचा १०- ३, वीरेश कुुंडूचा ८- ० तर पंजाबच्या सोनूचा ८- २ ने पराभव केला. यासह हरियाणाच्या विक्रांतचा ८- ४ ने पराभव करीत विजय मिळविला. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करणारा शैलेश पुण्यात सैन्य दलात कार्यरत आहे. त्यास अर्जुनवीर काका पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर गोचडे, शरद पवार यांच्यासह कुस्तीप्रेमींनी कौतुक केले आहे.

लातूरचा चौथा खेळाडू...

यापूर्वी जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्यातून रुस्तुम ए हिंद स्व. हरिश्चंद्र बिराजदार, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार व शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. कुस्तीतील या तीन दिग्गजानंतर जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेला शैलेश शेळके चौथा खेळाडू ठरला आहे.

ऑलिम्पिक पात्रतेसाठी ही स्पर्धा महत्त्वाची...

या स्पर्धेत पहिल्या एक ते पाच क्रमांकात स्थान मिळविल्यास शैलेशला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी संधी आहे. यापूर्वी शैलेशने चमकदार कामगिरी करीत कुस्तीत नाव कोरले आहे. २०१९ साली उपमहाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकाविला. २०१७ साली स्लोव्हाकिया येथे झालेल्या कॅडेट कुस्ती स्पर्धेतही त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले यासह सीनिअर व ज्युनिअर नॅशनल स्पर्धेतही पदके पटकाविली. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर तो काही दिवस मैदानाबाहेर होता. मात्र, पुन्हा कमबॅक करीत हे यश शैलेशने मिळविले आहे.

उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्नशील...

जागतिक कुस्ती स्पर्धेत संधी मिळाली, याचा आनंद आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा आपला मानस आहे. ऑलिम्पिकच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची असल्याने सर्वतोपरी प्रयत्न असेल.
- शैलेश शेळके, उपमहाराष्ट्र केसरी मल्ल.

Web Title: Latur's Shailesh Shelke selected in Indian squad for Senior World Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.