लातूरचा संघ चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:03 PM2017-11-16T23:03:51+5:302017-11-16T23:03:51+5:30
लातूर विभागाने अंतिम फेरीत बलाढ्य मुंबई संघावर १ गुण आणि १ मिनिट राखून विजय मिळवताना राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात कोल्हापूर अजिंक्य ठरला. याही गटात मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत विजेतेपद पटकावणारे लातूर आणि कोल्हापूरचे संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
राज्यस्तर शालेय खो-खो स्पर्धा : मुलांच्या गटात कोल्हापूर अजिंक्य
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लातूर विभागाने अंतिम फेरीत बलाढ्य मुंबई संघावर १ गुण आणि १ मिनिट राखून विजय मिळवताना राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात कोल्हापूर अजिंक्य ठरला. याही गटात मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत विजेतेपद पटकावणारे लातूर आणि कोल्हापूरचे संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
मुलींच्या गटात प्राची जटनुरे हिने ३ मिनिटे संरक्षण करून ४ गडी बाद केले. तसेच किरण शिंदे हिने ३ मि. ५० सेकंद संरक्षण करताना ३ गडी बाद करीत लातूर विभागाला विजेतेपद मिळवून देण्यात निर्णायक योगदान दिले. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूरने मुंबई संघावर २ गुणांनी मात केली. कोल्हापूरकडून ऋषिकेश शिंदे, अनिकेत जासूद यांचा खेळ निर्णायक ठरला. मुंबईकडून गिरिराज काळे व शैलेश आखाडे यांनी एकाकी झुंज दिली.
तत्पूर्वी, लातूर विभागाने उपांत्य फेरीत लातूरने नाशिक, तर मुंबई विभागाने औरंगाबादवर मात करीत अंतिम फेरी गाठली होती. मुलांच्या गटातील उपांत्य फेरीत कोल्हापूरने पुणे संघाचा, तर मुंबईने लातूर विभागावर मात करीत अंतिम फेरी गाठली होती.
स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडाधिकारी अरविंद विद्यागर, सुहासिनी देशमुख, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, संजय मुंढे, अजय पवार, खो-खो असोसिएशनचे प्रा.डॉ. तानाजी आगळे, चित्रा आगळे यांनी परिश्रम घेतले.