एनएमएसए मेट्रो ग्रुप बॅडमिंटन सुपर लीगचा शुभारंभ; गणेश नाईकांनी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा
By कमलाकर कांबळे | Published: October 21, 2023 10:37 PM2023-10-21T22:37:25+5:302023-10-21T22:37:37+5:30
उद्घाटनाच्या लढतीत मराठा वॉरियर्स संघाने द रॉकेटियर्स संघाचा १०-८ असा पराभव करीत विजयाचे खाते खोलले.
नवी मुंबई : वाशी येथील नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनच्या माध्यमातून प्रथमच भरविलेल्या मेट्रो ग्रुप बॅडमिंटन सुपर लीग स्पर्धेला शनिवारपासून शुभारंभ झाला. एनएमएसएचे अध्यक्ष तथा आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. उद्घाटनाच्या लढतीत मराठा वॉरियर्स संघाने द रॉकेटियर्स संघाचा १०-८ असा पराभव करीत विजयाचे खाते खोलले.
स्पर्धा नवी मुंबईमध्ये प्रथमच होत असून, लिलाव पद्धतीने २५० पैकी ८० खेळाडूंची निवड केली. स्पर्धेतून अमित खडगी, अक्षय कदम, सिद्धेश आरोस्कर, यश तिवारी, अपूर्वा आचरेकर, वेदिका कुलकर्णी यांचा खेळ जवळून बघण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळणार आहे. आमदार गणेश नाईक यांनी खेळाडूंना खेळ उंचावत नेऊन यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी स्पर्धा आयोजन समितीचे श्रीशैल मिटकरी, प्रकाश श्रीनिवासन, प्रकाश कृष्णन, समीर नायर, प्रकाश शेट्टी, एनएमएसएचे विजय पाटील, प्रकाश श्रीनिवासन, कविता गांगुली, मेट्रो ग्रुपचे विजय जैन आणि हितेश जैन आदी उपस्थित होते.
पहिल्याच लढतीत मराठा वॉरियर्स संघाने द रॉकेटियर्स संघाचा १०-८ असा पराभव केला. निनाद कामत-प्रशांत बहातरे, निहार केळकर-प्रचीती वालेपुरे, आदित्य वैशंपायन आदींनी सामने जिंकत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, सिद्धार्थ पाटील-तुषार मुने, अभिज्ञ सावंत-जिनांश जैन, अचित्य अगरवाल-विनित दाबक यांनी सरशी मिळवत द रॉकेटियर्स संघाला सामन्यात उभारी मिळवून दिली.
बरोबरीनंतर परतीच्या लढतीत निहार केळकर-प्रचीती वालेपुरे आणि आदित्य वैशंपायन-प्रशांत बहातरे यांनी सामने जिंकून संघाच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अन्य लढतीत फेदर कॅप संघाने स्मॅश इनाटर्स संघाचा १०-८, स्केचप्ले स्मॅशर्स संघाने एसएसआर मास्टर्स संघावर १२-६ असा विजय नोंदविला.