भारताच्या लक्ष्मणन्, चित्राला सुवर्णपदक, गोळाफेकीमध्ये तेजिंदरपालला रौप्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 03:50 AM2017-09-20T03:50:15+5:302017-09-20T03:50:16+5:30
५व्या आशियाई इनडोर क्रीडा स्पर्धेत भारताचे गोविंदन् लक्ष्मणन्, पीयू चित्रा यांनी अनुक्रमे पुरुषांच्या ३ हजार व महिलांच्या १,५०० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.
अश्गबात : येथे सुरू असलेल्या ५व्या आशियाई इनडोर क्रीडा स्पर्धेत भारताचे गोविंदन् लक्ष्मणन्, पीयू चित्रा यांनी अनुक्रमे पुरुषांच्या ३ हजार व महिलांच्या १,५०० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. तेजिंदरपाल सिंगला गोळाफेकीमध्ये रौप्य, तर कुस्तीमध्ये धर्मेंद्रला कांस्यपदकावर समाधान मानवे लागले.
पुरुषांच्या ३ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गोविंदन् लक्ष्मणन्ने ८ मिनिटे ०२.३० सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या १,५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पीयू चित्राने ४ मिनिटे २७.७७ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात तेजिंदरपाल सिंगने १९.२६ मीटर अंतर गोळा फेकून रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या फ्री स्टाईल प्रकारात ७० किलोगटात धर्मेंद्रने कांस्यपदक संपादन केले. भारत मंगळवारपर्यंत ३ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदके जिंकून नवव्या स्थानावर आहे.