लक्ष्मीपती बालाजीची प्रथम श्रेणीतून निवृत्ती
By admin | Published: September 15, 2016 11:01 PM2016-09-15T23:01:01+5:302016-09-15T23:01:01+5:30
भारताचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मीपती बालाजीने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली
चेन्नई : भारताचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मीपती बालाजीने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली, पण तो इंडियन प्रीमिअर लीग आणि तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळण्यासह तामिळनाडू संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत कायम राहणार आहे.
३४ वर्षीय बालाजीने २००४ मध्ये पाकिस्तान दौऱ्यात संस्मरणीय कामगिरी केली होती. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना सांगितले की,‘मी भविष्याबाबत विचार करतो. आता मला कुटुंबासोबत वेळ घालविता येईल. मी प्रथम श्रेणी क्रिकेटला १६ वर्षे दिली आहे, पण आयपीएल व टीएनपीएलमध्ये खेळणे कायम ठेवणार आहे.’ आक्रमक गोलंदाज बालाजीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द छोटेखानी ठरली. त्याने केवळ ८ कसोटी, ३० वन-डे आणि ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने कारकिर्दीत १०६ प्रथम श्रेणी सामन्यात १२.१४ च्या सरासरीने १२०२ धावा केल्या आहेत तर २६.१० च्या सरासरीने ३३० बळी घेतले आहेत.
पाकिस्तान दौऱ्यात यजमान संघाच्या दिग्गज फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने अडचणीत आणणाऱ्या बालाजीने या दौऱ्याची आठवण ताजी करताना म्हटले की, ‘मी आऊटस्विंग चेंडू टाकला आणि इंजमान -उल-हकला त्याचा अंदाज आला नाही. मी तो क्षण कधीच विसरू शकत नाही. कारण आम्ही प्रथमच पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका जिंकली होती.’
दरम्यान, बालाजीला कारकिर्दीत अनेकदा दुखापतींना सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याला बराच वेळ राष्ट्रीय संघातून बाहेर राहावे लागले. बालाजीने माजी क्रिकेटपटूंची आठवण करताना म्हटले की,‘अनिल कुंबळे व झहीर खान यांनी मला माझ्या कारकिर्दीत बरीच मदत केली. झहीर चांगली व्यक्ती असून त्याने नेहमी माझे मनोधैर्य उंचावण्यास मदत केली.’