पराभवाला फलंदाज व ढिसाळ क्षेत्ररक्षण जबाबदार : मिलर
By admin | Published: April 21, 2016 04:17 AM2016-04-21T04:17:56+5:302016-04-21T04:17:56+5:30
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध झालेल्या निराशाजनक पराभवानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार डेव्हिड मिलरने संघाच्या पराभवासाठी कमजोर फलंदाजी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरले आहे
मोहाली : कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध झालेल्या निराशाजनक पराभवानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार डेव्हिड मिलरने संघाच्या पराभवासाठी कमजोर फलंदाजी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरले आहे.
सामन्यानंतर मिलर म्हणाला, ‘‘घरच्या मैदानावर खेळताना आम्हाला विजयाची चांगली संधी होती. मोठी धावसंख्या गाठून बाजी मारणे शक्य होते; परंतु फलंदाज अपयशी ठरले. हा पराभव निश्चित खूप निराशाजनक ठरला. आम्हाला सुरुवातीपासूनच मोठ्या भागीदारीची आवश्यकता होती. मात्र, ठराविक अंतराने विकेट पडल्याने आमच्यावर दबावही वाढला.’’
गोलंदाजांविषयी मिलरने सांगितले, ‘‘मोठ्या धावसंख्येअभावी गोलंदाजांवरही दबाव येतो. गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केली; मात्र त्याच वेळी क्षेत्ररक्षणामध्ये काही संधी गमावल्याने आम्ही अपयशी ठरलो. शॉन मार्शने शानदार फलंदाजी करताना संघाला सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नाही.’’
‘‘आत जर आम्हाला स्पर्धेतील उर्वरित सामन्यांत विजय मिळवायचा असेल, तर प्रथम फलंदाजांना आपल्या जबाबदारीची जाणीव होणे गरजेचे आहे. विशेषकरून मध्यल्या फळीतील फलंदाजांनी धावा काढणे जरुरीचे आहे. स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी आम्हाला फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा सर्वच बाबतींत खेळ उंचवावा लागेल,’’ असेही मिलरने सांगितले. (वृत्तसंस्था)