दुती चंदकडे देशाचे नेतृत्व
By admin | Published: April 21, 2017 01:53 AM2017-04-21T01:53:56+5:302017-04-21T01:53:56+5:30
भारताची अव्वल धावपटू दुती चंद हिच्या नेतृत्वाखाली आगामी आशियाई ग्रां. प्री. २०१७च्या तीन सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी १६ सदस्यांचा भारतीय संघ शनिवारी चीनला
नवी दिल्ली : भारताची अव्वल धावपटू दुती चंद हिच्या नेतृत्वाखाली आगामी आशियाई ग्रां. प्री. २०१७च्या तीन सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी १६ सदस्यांचा भारतीय संघ शनिवारी चीनला रवाना होईल. जियाजिंग आणि जिन्हुआ येथे अनुक्रमे २४ आणि २७ एप्रिलला स्पर्धेचे पहिले व दुसरे सत्र पार पडेल. यानंतर अंतिम सत्र ३० एप्रिलला चिनी तैपई येथे होईल.
४०० मी. शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनास आणि इंचिओन आशियाई क्रीडा २०१४ क्रीडा स्पर्धेत ४०० मी. शर्यतीतील कांस्यपदक विजेती पूवम्मा राजू अंतिम सत्रादरम्यान भारतीय संघात सामील होतील. या
दोन्ही खेळाडूंना चीनसाठी व्हिसा मिळालेला नाही.
त्याच वेळी, उंच उडीतील नवोदित खेळाडू १७ वर्षीय तेजस्विनी शंकरला पाठीला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघातील स्थान गमवावे लागले.
गेल्या आठवड्यात झालेल्या या दुखापतीमुळे तिला भारतीय संघातून दूर करण्यात आले.
दुती आणि रीना जॉर्ज महिलांच्या १०० मीटर शर्यतीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. त्याच वेळी, पुरुषांमध्ये विद्यासागर सिद्धारानयक याच्यावर भारताची मदार असेल. महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत टिंगु लुका भारतासाठी पदक मिळवण्यास प्रयत्न करेल. तसेच गोळाफेकमध्ये मनप्रीत कौर भारताच्या वतीने आव्हान उभे करेल.
नीरज चोप्रा आणि रविंदर सिंग भालाफेकची जबाबदारी पार पाडतील, तर राकेश बाबू तिहेरी उडी प्रकारामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. लांब उडी आणि उंच उडीमध्ये अनुक्रमे नीना वाराकिल आणि जीनू मारिया यांच्यावर भारताच्या आशा असतील. (वृत्तसंस्था)