लिएंडर पेस, रावेन क्लासेनचा सहज विजय
By admin | Published: January 8, 2015 01:25 AM2015-01-08T01:25:18+5:302015-01-08T01:25:18+5:30
चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरी गटात भारताचा अनुभवी खेळाडू लिएंडर पेस याने रशियाच्या रावेन क्लासेनसह पहिल्या फेरीत सहज विजय मिळवून आगेकूच केली़
चेन्नई : सोमदेव देववर्मनला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे पुरुष एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरी गटात भारताचा अनुभवी खेळाडू लिएंडर पेस याने रशियाच्या रावेन क्लासेनसह पहिल्या फेरीत सहज विजय मिळवून आगेकूच केली़
भारताचा पेस आणि रशियाचा क्लासेन या जोडीने दुहेरीच्या पहिल्या फेरीत जबरदस्त कामगिरी करताना सरळ सेटमध्ये आॅस्ट्रियाचा आंद्रियस हैदरमाउरेर आणि स्लोव्हाकियाचा लुकास लाकवो या जोडीचा ६-४, ६-४ असा पराभव केला़ याआधी दुहेरीत भारताचा श्रीराम बालाली आणि जीवन नेदुचेझियन यांना दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता़ आता या स्पर्धेत सर्वांची नजर पेस आणि भूपती यांच्यावर आहे़ भूपती युवा खेळाडू साकेत मिनैनीसह स्पर्धेत आपले नशीब अजमावत आहे़
मंगळवारी झालेल्या एकेरी सामन्यात भारताचे सोमदेव देववर्मन, वाईल्डकार्डधारक रामकुमार रामनाथन, क्वालिफायर विजय सुंदर प्रशांत पहिल्याच फेरीत पराभूत होऊ न बाहेर झाले होते़ स्पर्धेतील दुहेरीच्या अन्य सामन्यांत द्वितीय मानांकन प्राप्त जर्मनीच्या आंद्रे बेगे मान व इटलीचा रॉबीन हॉस या जोडीने झेक प्रजासत्ताकाचे फ्रांसेक सेरमान व जिरी वेसेल या जोडीवर ७-६, ६-२ अशी मात करू दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला़