दडपण कसे झुगारायचे हे धोनीकडून शिकलो : रायुडू
By admin | Published: July 12, 2015 03:57 AM2015-07-12T03:57:25+5:302015-07-12T03:57:25+5:30
कठीण परिस्थितीला सामोरे जाताना दडपण कसे झुगारायचे, हे धोनीकडून शिकल्याचे अंबाती रायुडू याने शनिवारी सांगितले. झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या
हरारे : कठीण परिस्थितीला सामोरे जाताना दडपण कसे झुगारायचे, हे धोनीकडून शिकल्याचे अंबाती रायुडू याने शनिवारी सांगितले. झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या वन डेत शतक ठोकून संघाला विजय मिळवून देण्यात काल रायुडूने मोठी भूमिका बजावली होती.
तो म्हणाला, ‘‘आयपीएएलमध्ये मी गेली चार-पाच वर्षे दडपणात फलंदाजी करीत आहे. टीम इंडियाचादेखील भाग असल्याने धोनीला अशा स्थितीचा सामना करताना पाहिले आहे. धोनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काय करतो, हे जवळून पाहता आले. मी जे काही शिकलो ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करतो.’’
कालची माझी खेळी अत्यंत विशेष होती, असे सांगून रायुडू म्हणाला, ‘‘माझ्या उत्कृष्ट खेळींपैकी ही एक खेळी होती. पाच विकेट पडल्यानंतरही शतक ठोकले. सुरुवातीला चेंडू उसळी घेत
असल्याने आम्ही झिम्बाब्वेत नव्हे, तर इंग्लंडमध्ये खेळत असल्याचा
भास होत होता. माझ्या शतकाच्या बळावर देशाला विजय मिळाला,
ही आनंद देणारी घटना आहे.
पुढच्या सामन्यात नाणेफेकीचा
कौल आमच्या बाजूने येईल, अशी आशा आहे.’’
रायुडूने ३० वन डेत ४५ च्या सरासरीने पाच अर्धशतके आणि दोन शतकांसह ९११ धावा केल्या आहेत.
संघाचा नियमित सदस्य नसल्याचा खेळावर प्रतिकूल
परिणाम होतो का, काल असे विचारताच रायुडू म्हणाला, ‘‘मी अशा परिस्थितीनुरुप स्वत:ला सज्ज
ठेवतो. मी लक्ष्य निर्धारित
करीत नसल्याने दडपण जाणवत नाही. पण जेव्हा संधी मिळते तेव्हा माझा हा अखेरचा सामना आहे, असे समजून स्वत:ला सिद्ध करण्याचा पुरेपूर
प्रयत्न करतो. संधीच्या नेहमी शोधात असतो.’’
(वृत्तसंस्था)