धोनीकडून शिकतोय : केदार जाधव
By admin | Published: June 17, 2017 02:51 AM2017-06-17T02:51:49+5:302017-06-17T02:51:49+5:30
उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे गुण हेरुन त्यांना योग्य पैलू पाडण्यात महेंद्रसिंग धोनीचा हातखंडा आहे. धोनी कर्णधार असताना त्याने रवींद्र जडेजाला असेच घडविले होते.
बर्मिंघम : उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे गुण हेरुन त्यांना योग्य पैलू पाडण्यात महेंद्रसिंग धोनीचा हातखंडा आहे. धोनी कर्णधार असताना त्याने रवींद्र जडेजाला असेच घडविले होते. आता तो केदार जाधवला घडवण्यात कर्णधार विराट कोहलीला मदत करीत आहे. केदारनेही आपल्या आतापर्यंतच्या यशाचे श्रेय धोनीला देताना धोनीकडून बरेच काही शिकायला मिळत असल्याचे म्हटले आहे.
पार्ट टाईम स्पीनर म्हणून काम करताना केदार जाधवने गुरुवारी भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात तमिम इक्बाल आणि मुशीफिकूर रहिम यांना बाद करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
केदार म्हणाला, जेव्हापासून मी भारतीय संघात आलोय तेव्हापासून मी धोनीसमवेत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या अनुभवाचा फायदा करून घेण्याचा माझा उद्देश असतो. गोलंदाजी कोणत्या टप्प्यावर करायची आहे, हे मला धोनीच्या डोळ्यात पाहून कळते. मी त्याप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करीत असतो.
कर्णधार कोहलीनेही मान्य केले की, बांगलादेशी फलंदाज इतर फिरकी गोलंदाजांना आरामात खेळत असताना धोनीने केदारकडे चेंडू सोपवण्यास सांगितले.
कोहली म्हणाला, अशा अडचणीच्या वेळी मी धोनीला विचारुनच निर्णय घेतो. आम्हा दोघांना त्या वेळी केदार हा योग्य पर्याय वाटला. केदारनेही आमचा निर्णय सार्थ ठरविला.
कोहली म्हणाला, केदार हा नेटमध्ये फारशी गोलंदाजी करीत नाही, परंतु फलंदाजांच्या अँगलमधून त्याला कळते की कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी केल्यास फलंदाजाला अडचणीचे ठरू शकते. केदारने कर्णधाराचा विश्वास या सामन्यात सार्थ ठरवला(वृत्तसंस्था)