ली चाँग वेईच्या विजेतेपदाचा ‘चौकार’
By admin | Published: March 14, 2017 12:45 AM2017-03-14T00:45:46+5:302017-03-14T00:45:46+5:30
जागतिक क्रमवारीतील अव्वल बॅडमिंटनपटू आणि मलेशियाचा अग्रमानांकित ली चाँग वेई याने अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आॅल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे चौथ्यांदा
बर्मिंगहॅम : जागतिक क्रमवारीतील अव्वल बॅडमिंटनपटू आणि मलेशियाचा अग्रमानांकित ली चाँग वेई याने अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आॅल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. त्याने १३ व्यांदा या स्पर्धेत खेळताना चौथ्या जेतेपदास गवसणी घातली आहे.
अत्यंत एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात वेई याने आपला दर्जा सिद्ध करताना चीनच्या शी युकी याचा २१-१२, २१-१० असा फडशा पाडून सहजपणे विजेतेपदावर नाव कोरले. विशेष म्हणजे, युकीने कारकिर्दीत पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, अनुभवी वेईसमोर त्याचा काहीच निभाव लागला नाही.
त्याचवेळी, या स्पर्धेआधी वेई याने यंदाची आॅल इंग्लंड स्पर्धा आपल्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असेल, अशी घोषणा करून बॅडमिंटनविश्वाचे लक्ष वेधले होते. या स्पर्धेआधी ४ फेब्रुवारीला त्याच्या डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. या वेळी सरावादरम्यान तो कोर्टवर कोसळला होता. त्याचवेळी, आॅल इंग्लंड स्पर्धेच्या ९ दिवसआधीही चाँग वेई दुखापतीतून सावरला नव्हता. अशा परिस्थितीतही वेई खेळला आणि जेतेपद पटकावले.
या शानदार विजयानंतर मात्र वेई याने आपली घोषणा मागे घेतली आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षी आपले विजेतेपद राखण्यास नक्की येईन, असे जाहीर केले. ही स्पर्धा वेईची आवडती स्पर्धा असून त्याने विजयानंतर म्हटले, ‘‘दरवर्षी मी ही स्पर्धा खेळण्यासाठी येतो आणि येथे मला घरच्या मैदानावर खेळल्यासारखे वाटते. पुढच्या वर्षी माझे विजेतेपद राखण्यासाठी मी नक्की येथे
पुन्हा येईन. खरं म्हणजे ही स्पर्धा मी जिंकलो हेच माझ्यासाठी अनपेक्षित ठरले.’’
दखल घेण्याची बाब म्हणजे, उपविजेता ठरलेल्या युकीने उपांत्य सामन्यात वेईचा कट्टर प्रतिस्पर्धी लीन डॅन याला नमवले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात वेईपुढे तगडे आव्हान होते, अशी चर्चा होती. परंतु, वेईने कोणतेही दडपण न घेता आपला दर्जा सिद्ध करीत सहज बाजी मारली. ‘मी या सामन्यातून वेईकडून खूप काही शिकलो. तो तंत्र आणि खेळाच्याबाबतीत माझ्याहून खूप पुढे आहे.’’ (वृत्तसंस्था)