गेल फेअरफॅक्सविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार
By admin | Published: January 8, 2016 03:31 AM2016-01-08T03:31:06+5:302016-01-08T03:31:06+5:30
गेल्या वर्षी वर्ल्डकपदरम्यान एका महिलेसोबत केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपात गुंतलेला वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने फेअरफॅक्स मीडियाविरुद्ध प्रतिमा मलिन करण्याचा आरोप लावला आहे
मेलबोर्न : गेल्या वर्षी वर्ल्डकपदरम्यान एका महिलेसोबत केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपात गुंतलेला वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने फेअरफॅक्स मीडियाविरुद्ध प्रतिमा मलिन करण्याचा आरोप लावला आहे आणि आता याविषयी त्याने या मीडिया कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
आॅस्ट्रेलियन पत्रकाराविषयी असभ्य मत व्यक्त करण्याच्या वादामुळे माफी मागून शिक्षेपासून वाचलेल्या गेलने त्याच्यावर करण्यात आलेल्या विनयभंगाच्या त्याच्यावरील दुसऱ्या आरोपाचे खंडन केले आहे. गेलचे एजंट सायमन ओटोरी यांनी म्हटले, ‘‘ख्रिसने फेअरफॅक्सद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या आरोपाचे खंडन केले आहे. ख्रिसने आरोपाचे वारंवार खंडन केल्यानंतरही फेअरफॅक्सने या प्रकरणाला जास्त महत्त्व दिले. त्यामुळे त्याच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. आम्ही फेअरफॅक्सविरुद्ध अबु्रनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. ख्रिसविरुद्ध चुकीचे आरोप केल्यामुळे ख्रिस आणि त्याचे मॅनेजमेंट कायदेशीर कारवाई करू शकतात आणि त्यासाठी आॅस्ट्रेलियातील एक आघाडीचे वकील मार्क ओ ब्रायन यांनादेखील नियुक्त करण्यात आले आहे.’’
उल्लेखनीय बाब म्हणजे, वर्ल्डकपदरम्यान विंडीज संघाशी निगडित आॅस्ट्रेलियन महिलेने फेअरफॅक्स मीडियाशी बोलताना गेलवर विनयभंगाचा आरोप केला होता. याआधी ३६ वर्षीय गेलवर बिग बॅश लीगमध्ये एका महिला टीव्ही पत्रकार मॅक्लॉगलनशी खराब वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध १० हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता. तथापि, या प्रकरणानंनतर गेलने माफीही मागितली होती.