लीनपुढे गुजरात ‘दीन’
By admin | Published: April 8, 2017 12:39 AM2017-04-08T00:39:14+5:302017-04-08T00:39:14+5:30
धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात लायन्सला दहा विकेटस, आणि ३१ चेंडू शिल्लक ठेवून हरवले.
राजकोट : सलामीवीर ख्रिस लीन आणि गौतम गंभीर यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात लायन्सला दहा विकेटस, आणि ३१ चेंडू शिल्लक ठेवून हरवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात लायन्सने दिलेले १८४ धावांचे आव्हान केकेआरने एकही गडी न गमावता पूर्ण केले. ट्वेंटी-20 प्रकारात नाबाद धावांचा पाठलाग विक्रमी ठरला आहे. लीन ९३ तर गंभीर ७६ धावांवर नाबाद राहिले.
राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर फलंदाजीस पूरक खेळपट्टीवर झालेल्या या सामन्यात केकेआरच्या तुफानापुढे गुजरात लायन्स अक्षरश: ‘दीन’वाणा बनला होता. आॅस्ट्रेलियन लीनने गुजराती गोलंदाजीच्या ढोकळ्याचा चवीने फडशा पाडला. त्याने ४१ चेंडू खेळताना ६ चौकार तर ८ षटकार ठोकले. गंभीरने ४८ चेंडूत १२ चौकार मारले.
तत्पूर्वी, ब्रेंडन मॅक्क्युलम आणि कर्णधार सुरेश रैना आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर गुजरात लायन्सने ‘आयपीएल’च्या दहाव्या सत्राची सकारात्मक सुरुवात केली. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध २0 षटकांत ४ बाद १८३ धावांची मजल मारली. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने नवव्या षटकांत धोकादायक मॅक्क्युलमला बाद केल्यानंतर लगेच अॅरोन फिंचलाही माघारी धाडत कोलकाताला सामन्यात पुनरागमन करून दिली.
नाणेफेकीचा कौल जिंकून कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीरने यजमान गुजरातला प्रथम फलंदाजी दिली. जेसन रॉय आणि मॅक्क्युलम यांनी आक्रमक सुरुवात केली. त्यातही रॉय अधिक धोकादायक दिसला. त्याने टे्रंट बोल्ट आणि पीयूष चावला यांचा खरपूस समाचार घेत तीन खणखणीत चौकार लगावले. मात्र, अतिआक्रमणाच्या नादात तो चावलाच्याच गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर, रैनाने जम बसलेल्या मॅक्क्युलमसह चौफेर फटकेबाजीस सुरुवात केली. परंतु कुलदीपने कोलकाताला मोठा दिलासा देताना मॅक्क्युलमला पायचित पकडले. मॅक्क्युलमने २४ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावा काढल्या. यानंतर, आलेल्या अॅरोन फिंचने ८ चेंडूत २ उत्तुंग षटकार ठोकत १५ धावा वसूल केल्या. फिंच मोठी खेळी करणार असे दिसत असताना पुन्हा एकदा कुलदीपने मोलाची कामगिरी करताना फिंचला बाद केले. यामुळे आक्रमक सुरुवात केलेल्या गुजरातच्या धावसंख्येला ब्रेक लागला. पण नंतर दिनेश कार्तिकने कर्णधाराला साथ देत डाव सावरला. सुरेश रैना ६८ धावांवर नाबाद राहिला, तर कार्तिक ४७ धावा करून बाद झाला. (वृत्तसंस्था)
धावफलक
गुजरात लायन्स : जॅसन रॉय झे. पठाण गो. चावला १४, ब्रॅण्डन मॅक्युलम पायचित गो. कुलदीप यादव ३५, सुरेश रैना नाबाद ६८, अॅरोन फिंच झे. यादव गो. कुलदीप यादव १५, दिनेश कार्तिक झे. यादव गो. ट्रेंट बोल्ट ४७, डॅरेन स्मिथ नाबाद ०. अवांतर ४, एकूण २० षटकांत ४ बाद १८३. गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट ४-०-४०-१, पियुष चावला ४-०-३३-१, सुनील नरेन ४-०-३३-०, क्रीस व्होक्स् ३-०-२५-२, कुलदीप यादव ४-०-२५-२, युसूफ पठाण १-०-१५-०
कोलकाता : गौतम गंभीर नाबाद ७६, स्क्रीस लेन नाबाद ९३. अवांतर १५ एकूण १४.५ षटकांत बिनबाद १८४
गोलंदाजी : प्रवीण कुमार २-०-१३-०, धवल कुलकर्णी २.५-०-४२-०, मनप्रीत गोनी २-०-३२-०, शिवल कौषिक ४-०-४०-०, डॅरेन स्मिथ १-०-२३-०, शदाब जकाती ३-०-३०-०