‘तो’ निर्णय धोनीलाच घेऊ द्या : साहा
By admin | Published: July 16, 2017 02:06 AM2017-07-16T02:06:04+5:302017-07-16T02:06:04+5:30
महेंद्रसिंग धोनीने कसोटी संघातून निवृत्ती घेतल्यानंतर रिद्धिमान साहाला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले. यानंतर साहाने आपल्या खेळाने संघ व्यवस्थापनाची
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने कसोटी संघातून निवृत्ती घेतल्यानंतर रिद्धिमान साहाला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले. यानंतर साहाने आपल्या खेळाने संघ व्यवस्थापनाची मने जिंकून स्वत:चे स्थान पक्के केले.
भारताच्या आगामी श्रीलंका मालिकेसाठी साहा सध्या सराव करतोय. एका वृत्तपत्राला
दिलेल्या मुलाखतीत साहाने महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीविषयी भाष्य केले. तो म्हणाला, ‘धोनी कधी निवृत्त होईल, हा त्याचा प्रश्न आहे, तो निर्णय त्यालाच घेऊ द्या. प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत एक वाईट काळ येतोच. त्या खेळाडूची कामगिरी ढेपाळते, तरीही तो खेळाडू संघाच्या विजयात कसा हातभार लावतोय, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरते. दहापैकी दहा सामन्यात प्रत्येक वेळी तुम्हाला चांगली कामिगरी करता येईल असेही नाही. धोनीने कधी निवृत्त व्हावे, हा त्याचा प्रश्न आहे.’
२०१० मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलेल्या साहाला धोनी संघात असेपर्यंत फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र २०१४ मध्ये धोनीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर साहाची कसोटी संघात वर्णी लागली होती.
साहाने कर्णधार कोहलीच्या नेतृत्वाचेदेखील कौतुक केले. २६ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यात भारत तीन कसोटी, पाच वन-डे आणि एक टी-२० सामना खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपाठोपाठ वेस्ट इंडिज दौऱ्यातही महेंद्रसिंग धोनीला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे धोनीच्या जागेवर वन-डे संघात पर्याय शोधण्याची मागणी हळूहळू जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर रिद्धिमान साहाने केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.