अक्षर कसोटीत
By admin | Published: December 23, 2014 02:12 AM2014-12-23T02:12:45+5:302014-12-23T02:12:45+5:30
जखमी रवींद्र जडेजा याच्याऐवजी युवा अक्षर पटेल याने आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियामध्ये स्थान पटकावले आहे
मेलबोर्न : जखमी रवींद्र जडेजा याच्याऐवजी युवा अक्षर पटेल याने आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियामध्ये स्थान पटकावले आहे. तो अखेरच्या दोन सामन्यांत खेळू शकतो. जडेजा खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. बीसीसीआयच्या माहितीनुसार, अक्षर पटेल आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात जडेजाचे स्थान घेईल. जडेजाच्या खांद्याला दुखापत असून, तो विश्रांतीसाठी मायदेशात परत येईल.
दुखापतीनंतर जेडजा हा कसोटी मालिकेपाठोपाठ सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेस मुकणार आहे. भारताच्या विश्वचषक मोहिमेची ही तयारी असल्याने जडेजाऐवजी अक्षरला मोठी संधी मिळाली आहे. २० वर्षांचा फिरकी गोलंदाज अक्षरने नऊ वन-डेत १४ गडी बाद केले आहेत.
लंकेविरुद्ध त्याने ४० धावा देत चार गडी बाद करण्याची सर्वश्रेष्ठ कामगिरी केली होती. या मालिकेत त्याने ११ गडी बाद केले. अक्षर २०१२ ला रणजी चषकाचा पहिला सामना खेळला. त्याने प्रथमश्रेणीत आतापर्यंत ३२ गडी बाद केले. गुजरात संघाकडून सौराष्ट्रविरुद्ध तो सध्या रणजी सामन्यात व्यस्त आहे. पहिल्या डावात त्याने ७२ धावांत चार गडी टिपले. शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याआधी अक्षर मेलबोर्न येथे दाखल होईल. (वृत्तसंस्था)