लुईस हॅमिल्टनने पटकावले सहावे विक्रमी विश्वविजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 03:26 AM2019-11-05T03:26:31+5:302019-11-05T03:26:58+5:30
फॉर्म्युला वन : दिग्गज मायकल शुमाकरचा विश्वविक्रम आला आवाक्यात
ऑस्टिन : ब्रिटनचा दिग्गज फॉर्म्युला वन (एफ-वन) ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन याला रविवारी झालेल्या अमेरिकन ग्रॅ. प्री. शर्यतीत दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याच्याच मर्सिडीज संघाच्या वालेटरी बोटास याने अव्वल स्थान राखत बाजी मारली. मात्र यानंतरही हॅमिल्टनने एकूण गुणतालिकेत सर्वाधिक गुणांसह आपले अव्वल स्थान भक्कम करताना विक्रमी सहाव्यांदा फॉर्म्युला वन विश्वविजेतेपद पटकावले. यासह जर्मनीचा दिग्गज मायकल शुमाकरच्या सात विश्वविजेतेपदांच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्यापासून हॅमिल्टन केवळ एका जेतेपदाने दूर आहे.
३४ वर्षीय हॅमिल्टनने या शर्यतीत पाचव्या स्थानावरून, तर फिनलँडच्या बोटासने पहिल्या स्थानावरून शर्यतीला सुरुवात केली. बोटासने सुरुवातीपासून राखलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना कोणालाही आपल्यापुढे जाऊ दिले नाही. दरम्यान, हॅमिल्टनने दोन वेळा या शर्यतीत बोटासला मागे टाकत आघाडी घेतली होती. मात्र, अखेरचे तीन लॅप बाकी असताना बोटासने मोक्याच्या क्षणी हॅमिल्टनला मागे टाकले. यानंतर मात्र हॅमिल्टनला पुन्हा आघाडी घेणे जमले नाही आणि बोटासने शर्यतीवर आपले नाव कोरले. त्याचवेळी बेल्जियमच्या मॅक्स वेरस्टापेनने तिसºया स्थानावर कब्जा केला. हॅमिल्टनने तब्बल १५०व्यांदा पोडियमवर जागा मिळवताना सलग ३१व्या शर्यतीमध्ये गुण मिळवण्याची कामगिरी केली. त्याने आपल्या कारकिर्दीत सहावे विश्वविजेतेपद मिळवले असून आता तो दिग्गज शुमाकरच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्यात यशस्वी ठरतो का, याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.
अव्वल एफ-वन विश्वविजेते :
मायकल शुमाकर
(जर्मनी) : ७
लुईस हॅमिल्टन
(ब्रिटन) : ६
जुआन मॅन्युअल फॅनजिओ (अर्जेंटिना) : ५
अॅलन प्रोस्ट (फ्रान्स) : ४
सेबेस्टियन वेटेल (जर्मनी) : ४
रेसनंतर विश्वविजयाचा जल्लोष
अमेरिकन ग्रँप्री शर्यतीत दुसºया स्थानी राहिल्यानंतर सर्वाधिक गुणांच्या जोरावर हॅमिल्टनचे विश्वविजेतेपद निश्चित झाले. यानंतर त्याने चाहत्यांसह सहाव्या विश्वविजेतेपदाचा जल्लोष केला. हॅमिल्टन याआधी २००८, २०१४, २०१५, २०१७ व २०१८ साली विश्वविजेता ठरला होता.