लुईसची खेळी सर्वोत्तम खेळींपैकी एक

By admin | Published: July 12, 2017 12:40 AM2017-07-12T00:40:54+5:302017-07-12T00:40:54+5:30

पूर्ण क्षमता असलेला विंडीज संघ विश्व क्रिकेटसाठी लाभदायक आहे आणि भारताविरुद्धच्या एकमेव टी-२० लढतीत त्याची प्रचिती आली.

Lewis Kies is one of the best innings | लुईसची खेळी सर्वोत्तम खेळींपैकी एक

लुईसची खेळी सर्वोत्तम खेळींपैकी एक

Next

सौरभ गांगुली लिहितात...
पूर्ण क्षमता असलेला विंडीज संघ विश्व क्रिकेटसाठी लाभदायक आहे आणि भारताविरुद्धच्या एकमेव टी-२० लढतीत त्याची प्रचिती आली. इर्विन लुईसने आक्रमक क्रिकेट खेळताना चाहत्यांना रिझविले व संघाला विजयही मिळवून दिला. त्याच्या खेळात कॅरेबियन शैली दिसून आली. यापूर्वी खेळल्या गेलेल्या टी-२० लढतीत भारतीय संघाच्या मार्गात लुईस अडथळा ठरला होता आणि रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यातही विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ त्याच्यापुढे सपशेल अपयशी ठरला. त्याने दोन संधी दिल्या असल्या तरी, त्यामुळे त्याने केलेल्या खेळीचे महत्त्व कमी होणार नाही. त्याच्या आक्रमक खेळीला लगाम घालण्यासाठी भारतीय संघाकडे काही पर्याय होते. संघाला २० षटकांत १९० धावांचे आव्हान पार करून देण्यासाठी विंडीजच्या एका फलंदाजाकडून अशाप्रकारची खेळी आवश्यक होती.
भारतीय संघाची आक्रमक सुरुवात बघता संघाने दोनशे धावांचा पल्ला पार करणे अपेक्षित होते. पण कोहली व धवन बाद झाल्यानंतर यजमान संघाने पुनरागमन केले. पदार्पणाची लढत खेळणाऱ्या ऋषभ पंतसाठी ही खडतर लढत होती. दिनेश कार्तिक व पंत यांनी धावगती वाढविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना विंडीजच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवता आले नाही. कार्तिक बाद झाल्यानंतर धोनी व कुलदीप यादव यांना विशेष छाप सोडता आली नाही. त्यामुळे भारताच्या धावगतीवर प्रभाव पडला. फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर १९० धावांचे लक्ष्य आव्हानात्मक होते. भारतीय वेगवान गोलंदाज विंडीजच्या आघाडीच्या फळीला रोखण्यात कितपत यशस्वी ठरतात, यावर सर्व काही अवलंबून होते. गेलने संयमी खेळी केली, पण लुईसने मात्र आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने एकाही गोलंदाजाला सेट होण्याची संधी दिली नाही. लुईसने गुडलेंग्थवरील चेंडूला पुढे सरसावत सीमारेषा दाखविली तर आखूड टप्प्याच्या चेंडूंना त्याने मिडविकेट सीमारेषेचा मार्ग दाखविला. अशा प्रकारची आक्रमक खेळी करताना दैवाची साथ मिळणे आवश्यक असते आणि भारतीय क्षेत्ररक्षकांनी त्याला दोन संधी बहाल केल्या. या युवा खेळाडूने सुरुवातीपासून आक्रमक खेळी करीत वर्चस्व गाजवले. कुलदीप यादवचा काहीअंशी अपवाद वगळता भारतीय फिरकीपटूंना छाप सोडता आली नाही. शमीला लयच गवसली नाही, त्यामुळे लुईसला थोपविणे शक्य झाले नाही. टी-२० लढतीत १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ९ गडी राखून विजय मिळविण्याची कामगिरी प्रशंसनीय आहे. लुईसची खेळी सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे.
या निकालामुळे विंडीज क्रिकेट बोर्डाला संघात अनुभवी व युवा खेळाडूंचे मिश्रण असायला हवे, याची प्रचिती आली असेल. याचा योग्य ताळमेळ साधण्याची काळजी घेतली तर विंडीज क्रिकेटची सध्या असलेली स्थिती नक्कीच सुधारेल. (गेमप्लॅन)

Web Title: Lewis Kies is one of the best innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.