ली चोंग, वांग यिहान चॅम्पियन
By admin | Published: May 2, 2016 02:09 AM2016-05-02T02:09:41+5:302016-05-02T02:09:41+5:30
तिसरा मानांकित मलेशियाचा ली चोंग वेई आणि सहावी मानांकित चीनची वांग यिहान यांनी रविवारी संपलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत क्रमश: पुरुष आणि महिला गटात चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.
वुहान : तिसरा मानांकित मलेशियाचा ली चोंग वेई आणि सहावी मानांकित चीनची वांग यिहान यांनी रविवारी संपलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत क्रमश: पुरुष आणि महिला गटात चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.
विश्व क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ली चोंग वेई याने नंबर वन आणि अव्वल मानांकित चीनचा चेन लोंग याचा १ तास २२ मिनिटे रंगलेल्या मॅरेथॉन संघर्षात २१-१७, १५-२१, २१-१३ ने पराभव केला. या पराभवासोबतच चोंग वेईचा चेन लोंसोबतचा रेकॉर्ड १३-१२ असा झाला आहे.
चोंग वेई याने मागच्या महिन्याच्या सुरुवातीस मलेशिया ओपनच्या अंतिम सामन्यात चेन लोंगला पराभूत केले होते. चोंग वेई याने चीनच्या खेळाडूविरुद्ध सर्व चारही सामने सलगपणे जिंकले हे विशेष.
महिला गटाच्या अंतिम सामन्यात सहावी मानांकित वांग यिहान हिने विश्व क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली आणि या स्पर्धेतील टॉप सिड ली जुईरुई हिच्यावर एक तासात २१-१४, १३-२१, २१-१६ ने विजय नोंदविला. यिहानने या विजयासोबतच जुईरुईविरुद्ध आपला रेकॉर्ड १०-८ असा केला आहे.
दरम्यान मिश्र दुहेरीत चीनची जोडी झांग नैन आणि झाओ युनलेई विजेती ठरली. महिला दुहेरीचे जेतेपद टॉप सिड जपानची जोडी मिसाकी मत्सुतोमो- सयाका ताकाहाशी यांनी पटकविले.(वृत्तसंस्था)