मजूर आई-बापाच्या प्रवीणचा संघर्ष प्रेरणादायी, PM मोदींकडून मराठमोळ्या एथलेटचं कौुतक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 05:33 AM2021-06-28T05:33:14+5:302021-06-28T05:35:50+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरव; ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना शुभेच्छा
नवी दिल्ली : भारताचा उत्कृष्ट तिरंदाज प्रवीण जाधव यांनी बिकट स्थितीवर मात करून क्रीडाकौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातल्या एका गावाचा रहिवासी असलेल्या प्रवीण याचे आईवडील मजुरी करून घर चालवितात. कष्टकऱ्याचा मुलगा भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे, ही केवळ प्रवीण जाधव यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे तर प्रत्येक देशवासीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमात सांगितले की, ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंपैकी अनेकांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
देशाची महिला हॉकी संघातील खेळाडू नेहा गोयल हिची आई व बहिणी सायकलच्या कारखान्यात काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. उत्कृष्ट तिरंदाज असलेल्या दीपिकाकुमारीच्या आयुष्यातही अनेक चढउतार आले. दीपिकाचे वडील रिक्षा चालवितात व आई नर्स आहे. भारतातर्फे ऑलिम्पिकला जाणारी ती एकमेव महिला तिरंदाज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील रहिवासी प्रियंका गोस्वामीचे वडील बसकंडक्टर आहेत. पदक मिळणाऱ्या खेळाडूला जी बॅग मिळते, ती लहानपणापासून प्रियंकाला खूप आवडायची. त्या आकर्षणापायी प्रियंकाने रेस वॉकिंगमध्ये भाग घेतला. आज ती या प्रकारातील चॅम्पियन आहे. भालाफेक या क्रीडाप्रकारातील खेळाडू शिवपाल सिंह बनारसचे रहिवासी असून त्यांचे सारे कुटुंबच खेळाशी जोडलेले आहे. त्यांचे वडील, काका, भाऊ हे सारेजण भालाफेकीत निपुण आहेत. शटल स्पर्धेतील भारतीय खेळाडू चिराग शेट्टी व सात्विक साईराज यांचीही ऑलिम्पिकमधील मेन्स डबल शटल स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. चिराग यांच्या आजोबांचे कोरोनाने नुकतेच निधन झाले. सात्विक गेल्या वर्षी कोरोनाने आजारी होते.
१४० कोटी लोकसंख्येच्या भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उल्लेख करणे हा खूप मोठा सन्मान आहे. ‘मन की बात’मध्ये त्यांनी केलेला माझा उल्लेख टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदकाचे लक्ष्य साधण्यासाठी निश्चित प्रेरणा देणारा आहे,’
-प्रवीण रमेश जाधव
मिल्खासिंग यांना वाहिली आदरांजली
भारताचे विख्यात अॅथलिट मिल्खासिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, मिल्खासिंग यांचे कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी निधन झाले. ते रुग्णालयात उपचार घेत असताना संपर्क साधून मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. २०१४ साली सुरतमध्ये नाइट मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी मिल्खासिंग आले असताना, त्यांच्याशी खेळांबद्दल चर्चा झाली होती.
तलवारपटू भवानीदेवीचेही केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, चेन्नई येथे राहणाऱ्या व तलवारबाजीत प्रवीण असलेल्या सी.ए. भवानीदेवी हिच्या प्रशिक्षणासाठी पैसा उभा करण्याकरिता तिच्या आईने स्वत:चे दागिने गहाण ठेवले. हरयाणातील भिवानी येथील मनीष कौशिक हा बॉक्सिंग खेळाडू शेतकऱ्याचा मुलगा आहे. लहानपणी शेतात काम करताकरता त्याने बॉक्सिंगची आवडही जोपासली, असेही मोदी यांनी सांगितले.