लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा
By admin | Published: June 27, 2016 10:21 AM2016-06-27T10:21:46+5:302016-06-27T10:53:32+5:30
आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरलेला अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. २७ - कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरलेला अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
त्याने तडकाफडकी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सोमवारी चिली विरुद्धच्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा ४-२ ने पराभव झाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये रंगलेल्या या सामन्यात मेस्सीने आपली पहिलीच पेनल्टी मिस केली.
न्यूजर्सी येथे झालेल्या अंतिम सामन्यानंतर दोन तासांच्या आतच मेस्सीने निवृत्तीची घोषणा केली. सलग दुस-यांदा कोपा अमेरिकेच्या अंतिम फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा चिलीकडून पराभव झाला. राष्ट्रीय संघाबरोबरचा माझा प्रवास संपला. हा माझा निर्णय आहे असे निराश झालेल्या मेस्सीने सांगितले.
आणखी वाचा
अंतिम सामन्यात मेस्सीला चिलीने जखडून ठेवले. त्याला मुक्तपणे खेळण्यास अजिबात वाव दिला नाही. पण पेनल्टी शूटआऊटमध्ये मेस्सीला ती संधी होती. मात्र त्याला या संधीचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. सामन्यानंतर मेस्सीचा हताश झालेला चेहराच सर्वकाही सांगून जात होता. अर्जेंटिनाकडून खेळताना मेस्सीने पहिल्यांदाज पेनल्टी शूट आऊटमध्ये गोल चुकवला. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी मेस्सीने जगभरातील कोटयावधी चाहत्यांना निवृत्तीचा चटका देणारा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा
२००५ मध्ये त्याने अर्जेंटिनाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. बार्सिलोना क्लबकडून खेळणा-या मेस्सीला आपल्या देशाला कुठल्याही महत्वाच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवून देता आले नाही. अर्जेंटिनाकडून सर्वाधिक ५५ गोल त्याने केले. कोपा अमेरिका अंतिम सामना त्याचा ११३ वा आंतरराष्ट्रीय सामना होता.