Emiliano Martinez controversial Video: अरेरे... पुरस्कार मिळताच भर मंचावर अर्जेंटिनाचा गोलकिपर हे काय करून बसला...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 05:32 PM2022-12-19T17:32:32+5:302022-12-19T17:34:54+5:30
पराभवापेक्षाही विजय पचवणं जमलं पाहिजे, असं म्हणतात ते खरंच आहे. कारण मार्टिनेझचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याच्यावर आता सडकून टीका होताना दिसतेय.
Emiliano Martinez controversial Video: फुटबॉल वर्ल्ड कप फायनलमध्ये अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अखेर लिओनल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा विजय झाला. सामना सुरूवातीच्या निर्धारित वेळेत २-२ अशा बरोबरीत आणि अतिरिक्त वेळेत प्रत्येकी १ गोल करत ३-३ अशा बरोबरी होता. पण मोक्याच्या क्षणी पेनल्टी शूट आऊटमध्ये ४-२ असा फरक राखत अर्जेंटिनाने कायलिन एम्बाप्पेच्या फ्रान्सचा पराभव केला. अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. अर्जेंटिनाने याआधी १९७८ आणि १९८६ मध्ये चमकदार कामगिरी करत ट्रॉफी जिंकली होती. अर्जेंटिनाला तिसऱ्यांदा हे विजेतेपद मिळवण्यासाठी ३६ वर्षे वाट पाहावी लागली. पण या विजयाच्या सेलिब्रेशनला गालबोट लागल्याचे दिसून आले.
FIFA World Cup 2022 फायनल जिंकल्यानंतर अर्जेंटिनाचा एमिलियानो मार्टिनेझ याने प्रतिस्पर्धी कायलिन एमबाप्पेची चेष्टा तर केलीच. पण त्याशिवाय त्याने एक आक्षेपार्ह कृत्य केल्याने त्याच्यावर सध्या सर्वत्र टीकेचा भडीमार होताना दिसतोय. अंतिम फेरीत दोन पेनल्टी वाचवणाऱ्या अर्जेंटिनाच्या एमिलियानो मार्टिनेझला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा 'गोल्डन ग्लोव्हज' पुरस्कार मिळाला. त्याने मंचावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर त्याने सर्व मान्यवरांकडून केलेले अभिनंदन स्वीकारले. पण त्यानंतर मात्र त्याने एक असे कृत्य केले ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चांगलीच टीका केली जात आहे. पाहा त्याने नक्की असं काय केलं...
Emi Martìnez wins the golden glove.
— Gareth Davies (@GD10) December 18, 2022
And then does this with it. pic.twitter.com/Mt43auNBJX
याशिवाय, अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी चेंजिंग रूममध्ये फ्रान्सवर विजय मिळाल्यावर आनंद साजरा केला. मार्टिनेझ आपल्या सहकाऱ्यांसोबत आनंदोत्सव साजरा करताना, फ्रेंच स्ट्रायकरची खिल्ली उडवताना दिसला. मार्टिनेझचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरूनही बरीच टीका होत आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याची खिल्ली उडवण्याचे कृत्य चाहत्यांना नक्कीच पटणारे नाही. त्यातही २३ वर्षीय एमबाप्पेने हरल्यानंतरही आपल्या खेळाने लोकांची मने जिंकली. या स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा 'गोल्डन बूट' पुरस्कारही त्याने पटकावला. त्यामुळे मार्टिनेझवर प्रचंड टीका केली जात आहे.