LIVE: धवन, कोहलीची अर्धशतके! भारत विजयासमिप
By admin | Published: June 11, 2017 03:29 PM2017-06-11T15:29:42+5:302017-06-11T20:39:58+5:30
विराट कोहलीची टीम इंडिया आणि एबी डिव्हिलियर्सची दक्षिण आफ्रिका लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर आज करो या मरो सामन्यासाठी आमनेसामने उभे ठाकले आहेत.
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 11 - विराट कोहलीची टीम इंडिया आणि एबी डिव्हिलियर्सची दक्षिण आफ्रिका लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर आज करो या मरो सामन्यासाठी आमनेसामने उभे ठाकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर राहित शर्माला अवघ्या 12 धावांवर मॉर्केलने यष्टीरक्षक डी-कॉककरवी झेलबाद केलं. मात्र शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दमदार अर्धशतके फटकावत भारताला विजयासमिप पोहोचवले आहे.
यापुर्वी, चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या या निर्णायक लढतीत भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणा-या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे आज हाराकिरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 50 षटकही पूर्ण खेळता आली नाहीत. 44.3 षटकात आफ्रिकेचा अख्खा संघ केवळ 191 धावांत गारद झाला. भारताकडून बुमराह आणि भुवनेश्वरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर अश्विन, पांड्या आणि जडेजा यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं. आफ्रिकेचे तीन फलंदाज धावबाद झाले.
भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-यामुळे सलामीवीर हाशिम अमला आणि डि-कॉक यांनी सावध सुरूवात केली होती. मात्र, 18 व्या षटकात अश्विनने अमलाला 35 धावांवर धोनीकरवी झेलबाद केलं. तर चांगली फलंदाजी करणा-या डी-कॉकला अर्धशतकानंतर रविंद्र जडेजाने त्रिफळाचीत केलं. डी-कॉकने 53 धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या डिव्हिलिअर्स आणि डुप्लेसिस ही जोडी जमत आहे असं वाटत असतानाच डिव्हिलिअर्स 16 धावांवर धावबाद झाला तर त्याच्यानंतर आलेला मिलर हा देखील केवळ 1 धाव काढून धावबाद झाला. त्यानंतर मैदानावर जम बसलेला डु-प्लेसिस मोठी खेळी करेल असं वाटत असतानाच 36 धावांवर हार्दिक पंड्याने त्याला क्लीन बोल्ड केलं. दोन फलंदाज एकामागोमाग धावबाद आणि नंतर जम बसलेला डु-प्लेसिस बाद झाल्याने आफ्रिकेचा संघ अडचणीत आला. त्यांच्यानंतर एकाही खेळाडूला मैदानात तग धरता आला नाही. ख्रिस मॉरीस, फेलुक्व्वायो, रबाडा आणि मॉर्ने मॉर्केल यांनी केवळ हजेरी लावण्याचेच काम केले.
श्रीलंकेविरोधात अनपेक्षितपणे पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विराट कोहलीने आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यासाठी उमेश यादवच्या जागी आर.अश्विनला संधी दिली आहे. श्रीलंकेविरोधात सुमार कामगिरी केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कसलेल्या फलंदाजांसमोर सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधला हा सामना म्हणजे एकप्रकारे उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. जो जिंकला त्याला उपांत्य फेरीचं तिकीट, पण जो हरला त्याचं चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हानच संपुष्टात येणार आहे.