LMOTY 2023: भारताचा स्टार युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 06:15 PM2023-04-26T18:15:32+5:302023-04-26T18:22:36+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला.
LokmatMaharashtrianOfTheYear : लोकसेवा/समाजसेवा, आयएएस, आयपीएस, राजकारण, शिक्षण, क्रीडा, कृषी, उद्योग/व्यवसाय, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने जगभरात महाराष्ट्राचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या गुणवंतांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरव करण्यात आला. यंदाचा क्रीडा विभागातील 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव ( Aniket Jadhav, Football, Kolhapur, Sports) याला प्रदान करण्यात आला. महिला क्रिकेटपटू किरण नवगिरे ( सोलापूर), क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर ( तुळजापूर, धाराशिव), बुद्धीबळपटू रौनक साधवानी ( नागपूर) आणि नेमबाज रुद्रांक्ष पाटील ( पालघर ) यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, परंतु अनिकेतने बाजी मारली.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले.
रिक्षा चालकाचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू असा अनिकेत जाधवचा प्रवास आहे. अवघ्या १७ व्या वर्षी त्याला जगातील २३ देशांतील संघाविरोधात खेळण्याची संधी मिळाली आहे. अशी कामगिरी करणारा तो कोल्हापुरातील एकमेव फुटबॉलपटू. वडील रिक्षा चालक, आई गृहिणी अशा सर्वसामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला आहे. घरची परिस्थिती बेताचीच. शाळेच्या मैदानावर फुटबॉलचे प्राथमिक धडे गिरवले. पाचवीपासून त्याचे पुणे क्रीडा प्रबोधिनीत शिक्षण झाले आहे. अनिकेतची २०१२-१३ मध्ये महाराष्ट्र राज्य संघातून सुब्रतो चषक शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. त्यातील कामगिरीमुळे तो ओळखला जाऊ लागला.
२०१४ मध्ये जर्मनीतील बार्यन म्युनिच या व्यावसायिक फुटबॉल क्लबने युवा फुटबॉलपटू शोधमोहीम घेतली. त्यात पुणे येथे निवड चाचणीत अनिकेत सर्वच पातळीवर सरस ठरला. त्याची जर्मनीला निवड झाली. बार्यन म्युनिच संघाकडून त्याने जर्मनीतील अव्वल संघांविरोधात अनेक गोल केले. त्याच्या या कामगिरीसाठी गोल्डन बूटचा तो मानकरी ठरला. त्याची कामगिरी पाहून जर्मनीतील प्रसिद्ध व्यावसायिक फ्रँकफर्ट क्लबने लाखो डॉलरला खेळण्याची ऑफर दिली. मात्र, देशासाठी खेळायचे आहे म्हणून ही ऑफर त्याने नम्रपणे नाकारली. #LMOTY2023