Lockdown News: लॉकडाऊनमध्येही डोपिंगविरुद्ध नाडाची ऑनलाईन सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 01:07 AM2020-05-07T01:07:27+5:302020-05-07T01:07:41+5:30
मागच्या वर्षी विक्रमी १८० प्रकरणे निकाली काढण्यात आली. हा एक विक्रम मानला जातो.’
नवी दिल्ली : अनेक वैद्यकीय उपकरणांची चणचण कायम असली तरी डोपिंगविरुद्ध ऑनलाईन सुनावणी शुक्रवारपासून सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेचे (नाडा) महासंचालक नवीन अग्रवाल यांनी बुधवारी दिली. कोरोनामुळे अनेक दिवसापासून नाडाची सुनावणी बंद होती.
वृत्तसंस्थेशी बोलताना अग्रवाल म्हणाले, ‘आम्ही ८ मेपासून आॅनलाईन सुनावणी सुरू करू. डोपिंगविरोधी शिस्तपालन समिती आणि डोपिंगविरोधी अपील समिती प्रलंबित प्रकरणांची सुनावणी करणार आहे. मागच्या वर्षी दोन्ही पॅनलने शानदार काम करीत सर्व प्रकरणांचा तपास पूर्ण केला होता. मागच्या वर्षी विक्रमी १८० प्रकरणे निकाली काढण्यात आली. हा एक विक्रम मानला जातो.’
ऑनलाईन सुनावणीसाठी अनेक अडचणी येतील याची जाणीव असल्याची कबुली देत अग्रवाल म्हणाले, ‘खेळाडूंना सुनावणीसाठी घरी इंटरनेटची सुविधा हवी. यात काही अडचणी आहेत, मात्र आम्ही यावर तोडगा काढत आहोत. खेळाडू आॅडिओ व्हिडिओदद्वारे उपलब्ध असतील तेव्हाच सुनावणी शक्य आहे.’ लॉकडाऊनमध्ये आॅनलाईन सुनावणी आणखी जलद करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या एनआयएस पतियाळा आणि साईचा बेंगळुरू परिसर बंद आहे. शासकीय निर्देशानुसार बाहेरच्या व्यक्तीला आत आणि आतील व्यक्तीला बाहेर जाता येत नाही. डोप नियंत्रण अधिकाऱ्याला आत जाण्याची परवानगी मिळू शकेल का, अशी विचारणा आम्ही गृहमंत्रालयाकडे केली आहे.