लोढा समितीने बीसीसीआयला पाठविली प्रश्नावली
By admin | Published: May 19, 2015 01:33 AM2015-05-19T01:33:59+5:302015-05-19T01:33:59+5:30
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना ८०पेक्षा अधिक प्रश्न विचारले
नवी दिल्ली : स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना ८०पेक्षा अधिक प्रश्न विचारले असून, त्यात बीसीसीआयमध्ये प्रशासकीय सुधारणा करण्याची जबाबदारीदेखील समितीकडे सोपविण्यात आली आहे.
या समितीत लोढा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. अशोक भान आणि आर. व्ही. रवींद्रन यांचा समावेश आहे. समितीने बीसीसीआयकडे विविध मुद्द्यांवर विचारणा केली असून, त्यात पदाधिकाऱ्यांची दुटप्पी भूमिका, आॅडिट, बँक खाते, आर्थिक प्रकरणे आणि पारदर्शीपणा, यांसारखी प्रकरणे आहेत.
दुटप्पी भूमिकेबाबत आयपीएल संघातील एखादा खेळाडू किंवा संघ अधिकारी फ्रेन्चायसीसोबत काम करीत असेल किंवा एखाद्या संघाचा मालक असेल तर बीसीसीआय त्यास दुटप्पी भूमिका मानते का, या स्थितीवर काय तोडगा काढण्यात आला, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
या प्रश्नाच्या उत्तरात कळविण्यात आले, की इंडिया सिमेंटचे मालक आणि सीएसकेचे सर्वेसर्वा एन. श्रीनिवासन यांच्या संदर्भात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतरच बीसीसीआयमध्ये अशीही मनमानी सुरू असल्याचे लोकांना कळले. याच प्रश्नांशी जुळलेल्या दोन उपप्रश्नांची उत्तरे एकाही पदाधिकाऱ्याला देता आलेली नाहीत. बीसीसीआय- आयपीएलशी संबंधित असलेले आणि व्यावसायिकहित जोपासणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी काही माहिती दडविली असेल तर त्यांना कुठल्या शिक्षेची तरतूद आहे, हा पहिला उपप्रश्न होता. आयपीएल व्यवसायात बोर्डाच्या प्रतिनिधींचे नातेवाईक
आणि निकटचे लोक असू नयेत यासाठी काय उपाययोजना करण्यात आली होती, हा दुसरा उपप्रश्न विचारण्यात आला. (वृत्तसंस्था)
बीसीसीआयकडे जी प्रश्नावली पाठविण्यात आली आहे, त्यात प्रश्नांची १ : संघटन, संरचना आणि संबंध, २ : कार्यालय समिती आणि निवडणूक, ३ : व्यावसायिक काम, करार आणि सेवा, ४ : आॅडिट, खाते आणि आर्थिक व्यवहार, ५ : खेळाडू कल्याण आणि विविध तोडगे, ६ : दुटप्पी भूमिका तसेच
७ निरीक्षण आणि पारदर्शीपणा, अशा सात विभागांत विभागणी करण्यात आली. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना ही प्रश्नावली मिळाली; पण एक अधिकारी ८२ पैकी केवळ ३५ प्रश्नांची उत्तरे देऊ शकला.