लोकेश राहुल कारकिर्दीत सर्वोत्तम स्थानी
By admin | Published: March 31, 2017 12:55 AM2017-03-31T00:55:24+5:302017-03-31T00:55:24+5:30
आॅस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे चौथ्या कसोटीत दोन अर्धशतके झळकविणारा सलामीवीर लोकेश राहुल हा
दुबई : आॅस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे चौथ्या कसोटीत दोन अर्धशतके झळकविणारा सलामीवीर लोकेश राहुल हा आयसीसी फलंदाजी क्रमवारीत सर्वोत्कृष्ट ११ व्या स्थानावर विराजमान झाला.
कर्नाटकच्या २४ वर्षांच्या राहुलचे मालिकेआधी क्रमवारीत ५७ वे स्थान होते. त्याने चार सामन्यात ६४, १०,९०, ५१,६७, ६० आणि नाबाद ५१ अशा धावा काढून थेट ४६ स्थानांची जबरदस्त झेप घेतली. यासह तो चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यानंतरचा सवोत्तम क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला.
दुसरीकडे, चेतेश्वर पुजारा चौथ्या आणि विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. पुजारा आणि कोहली यांची अनुक्रमे दोन व एका स्थानाने घसरण झाली आहे. चौथ्या कसोटीत भारताचे नेतृत्व केलेल्या अजिंक्य रहाणेने तीन स्थानांनी प्रगती करताना १४वे स्थान पटकावले असून मुरली विजय मात्र चार स्थानांनी ३४ व्या स्थानावर घसरला आहे. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ फलंदाजांध्ये पहिल्या तर न्यूझीलंडचा केन विलियम्सन दुसऱ्या स्थानावर आहे.
गोलंदाजीत रवींद्र जडेजा व रविचंद्रन आश्विन या फिरकी जोडीने पहिले दोन स्थान कायम राखले आहे. तसेच, आॅस्टे्रलियाविरुद्ध तुफानी मारा केलेला उमेश यादव करियरमधील सर्वोच्च २१ व्या स्थानी पोहोचला आहे. उमेशने चौथ्या कसोटीत पाच गडी बाद केले होते.
अष्टपैलूंमध्ये जडेजा चमकला असून त्याने अश्विनकडून दुसरे स्थान हिसकावले. बांगलादेशचा शकिब अल हसन अव्वल स्थानी आहे. जडेजाने धरमशाला येथे चार गडी बाद करुन ६३ धावांचे योगदान दिले. त्याला मालिकावीराचा सन्मान मिळाला. (वृत्तसंस्था)
आॅस्टे्रलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात अर्धशतक झळकावताना मालिकेत एकूण ३९३ धावा काढल्या. त्याने या मालिकेत तब्बल ६ अर्धशतक झळकावताना सलामीवीर म्हणून स्वत:चे स्थान भक्कम केले.
रविंद्र जडेजाने संपुर्ण मालिकेत निर्णायक अष्टपैलू कामगिरी करताना भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने चार सामन्यांत २५ बळी घेताना फलंदाजीतही चमक दाखवताना १२७ धावा काढल्या. त्यात, अखेरच्या कसोटीमध्ये पहिल्या डावात त्याने संघ अडचणीत असताना केलेली ६३ धावांची निर्णायक ठरली.
या अर्धशतकाच्या जोरावर आघाडी घेतल्यानंतर भारताने कांगारुंना लोळवले. विशेष म्हणजे, हुकमी फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विन प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यानंतरही जडेजाने आपल्या धडाक्यापुढे आश्विनच्या वर्चस्वाची कमतरता भासू दिली नाही.