लोकेश्वरची लढवय्या खेळी
By admin | Published: February 17, 2017 12:28 AM2017-02-17T00:28:04+5:302017-02-17T00:28:04+5:30
यष्टिरक्षक फलंदाज सुरेश लोकेश्वर याने प्रतिकूल परिस्थितीत नाबाद ९२ धावांची खेळी करून १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या लढतीत
नागपूर : यष्टिरक्षक फलंदाज सुरेश लोकेश्वर याने प्रतिकूल परिस्थितीत नाबाद ९२ धावांची खेळी करून १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या लढतीत भारताला इंग्लंडविरुद्धची लढत अनिर्णीत राखून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
इंग्लंडचा दुसरा डाव १६७ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे भारताला ४९ षटकांत २३८ धावा फटकावण्याचे लक्ष्य मिळाले. भारताची सुरुवात निराशाजनक झाली. एक वेळ भारताची ६ बाद ६१ अशी अवस्था झाली होती. लोकेश्वरने जबाबदारी स्वीकारीत २ तास १६ मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकून १२५ चेंडूंना सामोरे जात १४ चौकार लगावले. त्याला तळाच्या फळीतील सिजोमन जोसेफ (३२ चेंडू, १२ धावा) व कनिष्क सेठ (४९ चेंडू, १८ धावा) यांची योग्य साथ लाभली. त्यामुळे भारताला सामना अनिर्णीत राखण्यात यश आले.
हेन्री ब्रुक्स (५६ धावांत ३ बळी) आणि आरोन बियर्ड (२४ धावांत २ बळी) यांच्या अचूक माऱ्यापुढे भारताच्या आघाडीच्या फळीतील ५ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. डॅरिल फरेरो ३१ चेंडूंमध्ये ३७ धावांची खेळी करून तंबूत परतला. त्यामुळे भारतावर पराभवाचे संकट घोंघावत होते.
त्याआधी, इंग्लंड अंडर १९ संघाने कालच्या १ बाद २३ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. आॅफस्पिनर सिजोमन जोसेफच्या (६-६२) अचूक माऱ्यापुढे इंग्लंडचा डाव स्वस्तात निपटला. डेरिल फरेरोने १७ धावांत २ बळी घेतले. इंग्लंडतर्फे जॉर्ज बार्टलेटने सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली. इंग्लंडने पहिला डाव ५ बाद ५०१ धावसंख्येवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात भारताने पहिला डाव ८ बाद ४३१ धावसंख्येवर घोषित केला.
उभय संघांदरम्यान दुसरा व शेवटचा सामना नागपूरमध्ये २१ फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे.
(क्रीडा प्रतिनिधी)