इंग्लंडला लोळवत पाकिस्तानने गाठली फायनल
By admin | Published: June 14, 2017 09:48 PM2017-06-14T21:48:00+5:302017-06-14T21:48:00+5:30
बेभरवशाच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानने आज पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त कामगिरीने जगभरातील क्रिकेटप्रेमींचे ठोकताळे चुकवले. आज
Next
>ऑनलाइन लोकमत
कार्डिफ, दि. 14 - बेभरवशाच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानने आज पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त कामगिरीने जगभरातील क्रिकेटप्रेमींचे ठोकताळे चुकवले. आज झालेल्या उपांत्य लढतीत सुरुवातीला गोलंदाजांनी केलेला भेदक मारा आणि नंतर माफक आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीरांनी दिलेल्या शतकी सलामीच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडचा आठ गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासोबत पाकिस्तानने दिमाखात चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ आहे.
इंग्लंडने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना अझर अली आणि फकर झमान यांनी पाकिस्तानला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनीही 118 धावांची सलामी देत पाकिस्तानचा विजय निश्चित केला. त्यानंतर फकर झमान (57) आणि अझर अली (76) हे बाद झाले. मात्र बाबर आझम (नाबाद 38) आणि मोहम्मद हाफिझ (नाबाद 31) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण करत पाकिस्तानला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर यजमान इंग्लंडचा डाव अवघ्या 211 धावांत आटोपला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथ क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानण्यात येत असलेल्या इंग्लंडचा डाव पाकिस्तानी गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर गडगडला. सलामीवीर अॅलेक्स हेल्स (13) धावांवर बाद झाला. त्यानंतर बेअरस्टो (43) आणि जो रूट (46) यांनी केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर 28 व्या षटकात इंग्लंडने 2 बाद 128 अशी मजल मारली होती. पण रूट (46) आणि मॉर्गन (33) धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव कोलमडला.
आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्याने इंग्लंडची धावगती मंदावली. फटकेबाज बेन स्टोक्सलाही पाकिस्तानी माऱ्याचा सामना करताना सावध पवित्रा घ्यावा लागला. मात्र एकीकडून इतर फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतत असताना स्टोक्सने एक बाजू लावून धरत संघाला दोनशेपार मजल मारून दिली. अखेर शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात स्टोक्स 34 धावांवर बाद झाला. तो माघारी परतताच इंग्लंडचा डाव संपण्यास वेळ लागला नाही. पाकिस्तानकडून हसन अलीने तीन, जुनैद खान आणि रुमान रईसने प्रत्येकी दोन आणि शादाब खानने एक गडी बाद केला. तर इंग्लंडचे दोन फलंदाज धावचीत झाले.