केकेआरची नजर ‘प्लेआॅफ’वर
By admin | Published: May 7, 2017 12:40 AM2017-05-07T00:40:42+5:302017-05-07T00:40:42+5:30
सलग दोन पराभवांमुळे निराश झालेला कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१० मध्ये रविवारी स्पर्धेबाहेर पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंंगळुरुवर
बंगळुरु : सलग दोन पराभवांमुळे निराश झालेला कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१० मध्ये रविवारी स्पर्धेबाहेर पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंंगळुरुवर विजय नोंदवित ‘प्लेआॅफ’मध्ये स्थान निश्चित करण्याच्या आशेने उतरणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद आणि रायझिंग पुणे सुपरजायंटने केकेआरवर विजय नोंदविले होते. त्यामुळे प्लेआॅफमध्ये स्थान पटकावायचे झाल्यास केकेआरला तीनपैकी दोन सामने जिंकण्याचे आव्हान आहे. दोन वेळचा चॅम्पियन केकेआरचे ११ सामन्यांत १४ गुण असून हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. पुण्याचे १६ आणि हैदराबादचे १३ गुण आहेत. उभय संघांत झालेल्या मागच्या सामन्यात केकेआरने आरसीबीवर ८२ धावांनी विजय नोंदविला होता. आरसीबी संघ केवळ ४९ धावांत गारद झाला.
गौतम गंभीरचा संघ या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने खेळणार आहे. केकेआर सुनील नारायणकडून डावाचा प्रारंभ करण्याचा जुगार खेळत आहे. नारायणला सूर गवसला तर संघाचा विजय सोपा होतो. गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा हे चांगल्या सुरुवातीचा लाभ घेण्यात यशस्वी ठरले आहेत. पण हे तिघेही अपयशी ठरले, तर मात्र
युसूफ पठाणला जबाबदारीने खेळावे लागेल. मनीष पांडे उत्तम फॉर्ममध्ये असला तरी शेल्डन जॅक्सन अपेक्षेनुरुप कामगिरी करू शकलेला नाही. अशा वेळी झारखंडचा इशांक जग्गीला संधी मिळू शकते.
यंदा आरसीबीने घोर निराशा केली. हा संघ चार वेळा आॅल आऊट झाल्यामुळे १२ सामन्यांत केवळ पाच गुणांवर अडकून पडला. हा संघ आधीच बाहेर पडल्याने कर्णधार विराट कोहली आणि सहकाऱ्यांपुढे दोन्ही सामने जिंकून प्रतिष्ठा कायम राखण्याचे आव्हान असेल. त्यासाठी युवा खेळाडूंना संधी देणे योग्य ठरेल. गेल, डिव्हिलियर्स या दिग्गजांनी चाहत्यांची घोर निराशा केली. केदार जाधवच्या कामगिरीत सातत्य नव्हते, तर मनदीपसिंग आणि स्टुअर्ट बिन्नी हे अपयशीच ठरले. संघाचे दोन फिरकीपटू सॅम्युअल बद्री आणि यजुवेंद्र चहल यांनी मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे. (वृत्तसंस्था)