रोहित, राहुल यांच्या कामगिरीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:21 AM2017-07-21T01:21:43+5:302017-07-21T01:21:43+5:30
श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दाखल झालेल्या भारतीय संघाला आज शुक्रवारपासून दोन दिवसांचा सराव सामना अध्यक्ष एकादशविरुद्ध
कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दाखल झालेल्या भारतीय संघाला आज शुक्रवारपासून दोन दिवसांचा सराव सामना अध्यक्ष एकादशविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
रोहितने अखेरची कसोटी मागच्या वर्षी आॅक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळली. त्यानंतर इंग्लंड, बांगलादेश आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर तो सामने खेळू शकला नव्हता. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेदरम्यान त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. फिट झाल्यानंतर एकही प्रथमश्रेणी सामना न खेळताच तो थेट आयपीएलमध्ये उतरला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने संघात पुनरागमन करीत ३०० हून अधिक धावाही केल्या. निवडकर्त्यांनी त्याला विंडीज दौऱ्यातून सूट देत विश्रांती दिली. दुसरीकडे आॅस्ट्रेलियाविरुद्ध सात डावांत सहा अर्धशतके झळकविणारा राहुल शस्त्रक्रियेनंतरच पुनरागमन करीत आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे तो आयपीएल, चॅम्पियन्स ट्रॉफी व विंडीज दौऱ्यात खेळू शकला नव्हता. (वृत्तसंस्था)
मुरली विजयने तंदुरुस्ती चाचणी दिल्यानंतर स्वत:हून तंदुरुस्त नसल्याचे प्रामाणिकपणे सांगितले. प्रत्येक खेळाडू संघात चांगले प्रदर्शन करु इच्छितो. अभिनव मुकुंदकडे देशांतर्गत क्रिकेटचा खूप अनुभव आहे, तर धवनने गेल्या दौऱ्यात येथे शतक झळकावले आहे. तसेच, चेतेश्वर पुजारानेही धर्मशाळा येथील अखेरच्या सामन्यात डावाची सुरुवात केली होती. त्यामुळे खेळाडू अशा परिस्थितीकडे दबावापेक्षा एक संधी म्हणून पाहतात.
- विराट कोहली
मैदानावर उतरल्यानंतर सर्व सुत्रे खेळाडूंच्या हाती असतील आणि तसेच असले पाहिजे. खेळाडू व्यावसायिक क्रिकेटपटू असून त्यांना त्यांची जबाबदारी माहित आहे. मैदानावर नैसर्गिक खेळ खेळण्याची त्यांची मानसिकता तयार करावी, हे माझे काम आहे. कोणत्याही संघाप्रमाणे श्रीलंकेचा घरच्या मैदानावरील रेकॉर्ड चांगला आहे. या मालिकेत आम्ही कामगिरीत सुधारणा करण्यावर भर देऊ. असे न केल्यास खेळण्याला काहीच अर्थ राहत नाही.
- रवी शास्त्री