विराट, डिव्हिलीयर्स यांच्या कामगिरीकडे नजरा
By admin | Published: February 20, 2015 01:54 AM2015-02-20T01:54:59+5:302015-02-20T01:54:59+5:30
उभय संघातील दोन स्फोटक फलंदाज विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यापैकी धावांचा पाऊस कोण पाडेल याकडेही चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या असतील.
मेलबर्न : भारत-द. आफ्रिका यांच्यात रविवारी होणाऱ्या बहुप्रतीक्षित विश्वचषक सामन्यात काय घडेल याची चर्चा होत असताना उभय संघातील दोन स्फोटक फलंदाज विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यापैकी धावांचा पाऊस कोण पाडेल याकडेही चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या असतील.
आयसीसी वन डे क्रमवारीत डिव्हिलियर्स सध्या अव्वल स्थानावर आहे. विराटचे तिसरे स्थान असून दोघांनाही जगातील सर्वांत धोकादायक मानले जाते. दोन्ही संघांच्या यशाची भिस्तही याच दोन खेळाडूंच्या कामगिरीवर विसंबून राहील. विराटने विश्वचषकात धडाकेबाज सुरुवात करीत पाकविरुद्ध शानदार २२ वे वन डे शतक झळकविले होते. डिव्हिलियर्सने मात्र झिम्बाब्वेविरुद्ध २५ धावा केल्या.
करियरमधील आकडेवारीवर नजर टाकल्यास दोघांमध्ये बरेच साम्य आहे. डिव्हिलियर्सने १८० सामन्यांत ५१.९७ च्या सरासरीने ७४८४ धावा केल्या. त्यात १९ शतके आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने १५१ सामन्यांत ५१.९५ च्या सरासरीने ६३३९ धावा केल्या असून, त्यात २२ शतके व ३३ अर्धशतके आहेत. भारताच्या विजयात विराटचे योगदान आणि धावांचा पाठलाग करीत विजय नोंदविण्यात त्याने घेतलेली मेहनत डिव्हिलियर्सच्या तुलनेत कैकपटींनी जास्त आहे. डिव्हिलियर्सने देखील संघाच्या विजयात वेळोवेळी सर्वस्व पणाला लावले आहे. (वृत्तसंस्था)
टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंवर नजर : डोमिंगो
मेलबर्न : स्टार फलंदाज विराट कोहली वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा मुख्य आधारस्तंभ आहे़ मात्र, असे असले तरी २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लढतीत आम्ही केवळ कोहलीच नव्हे, तर भारताच्या सर्व मुख्य खेळाडूंविरुद्ध रणनीती बनविली आहे़ याच बळावर आम्ही या सामन्यात बाजी मारू, असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचा प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी व्यक्त केला आहे़
डोमिंगो पुढे म्हणाले, की कोहली गत दोन वर्षांपासून भारताच्या विजयात विशेष योगदान देत आहे़ हा फलंदाज कोणत्याही परिस्थितीत उत्कृष्ट खेळ करण्यास सक्षम आहे़ मात्र, असे असले तरी आम्ही केवळ कोहलीविरुद्धच नव्हे, तर सुरेश रैना, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, अजिंक्य रहाणे या खेळाडूंना लवकरात लवकर कसे बाद करता येईल याची योजना आखली आहे़ नक्कीच आमची रणनीती यशस्वी ठरेल अशी आशा आहे़