नजर दुसऱ्या फळीतील खेळाडूंवर

By Admin | Published: July 9, 2017 02:54 AM2017-07-09T02:54:06+5:302017-07-09T02:54:06+5:30

आज विम्बल्डनमधला पहिला रविवार. स्पर्धेचा सुटीचा दिवस. विम्बल्डनच्या अनेक प्रथांपैकी ही एक प्रथा. ह्यामागे हिरवळीची डागडुजी करण्याचं कारण सांगितलं जातं.

Look at the second-placed players | नजर दुसऱ्या फळीतील खेळाडूंवर

नजर दुसऱ्या फळीतील खेळाडूंवर

googlenewsNext

आज विम्बल्डनमधला पहिला रविवार. स्पर्धेचा सुटीचा दिवस. विम्बल्डनच्या अनेक प्रथांपैकी ही एक प्रथा. ह्यामागे हिरवळीची डागडुजी करण्याचं कारण सांगितलं जातं. हार्ड कोर्टस् आणि मातीच्या कोर्टस्च्या तुलनेत गवताची अधिक निगा राखावी लागते हे बाकी खरंच आहे. खेळाडूंनाही एक दिवस महत्त्वपूर्ण विश्रांती मिळते, ही त्यात अजून एक जमेची बाजू.
परवा आपण महिला गटातल्या विजेतेपदाच्या प्रमुख दावेदार बघितल्या. पुरुषांच्या विभागातले प्रमुख दावेदार आपण पुढल्या लेखात पाहूच, पण त्याआधी दोन्ही विभागातल्या विजेतेपदापासून फार जवळही नाहीत आणि फार लांबही नाहीत अशा दुसऱ्या फळीतल्या लोकांवर एक नजर टाकू. ह्यात तरुण तुर्कही आहेत आणि म्हातारे अनुभवी अर्कही.
गार्बिन मुगुरुझा आणि येलेना ओस्टापेंको : फ्रान्सची २४ वर्षांची आक्रमक खेळ करणारी गुणी खेळाडू. गेल्या वर्षीची फ्रेंच ओपन विजेती. खेळाडूने आक्रमक खेळ खेळावा आणि प्रेक्षकांनी त्याचा मनमुराद आनंद घ्यावा. मात्र अशा खेळाचे जसे फायदे तसे काही तोटेही असतातच. परिणामी, मुगुरुझाचा खेळ आकर्षक आहे, पण सातत्याचा अभाव असलेला आहे. यंदाची फ्रेंच ओपन विजेती असलेल्या येलेनाची परिस्थितीही तशीच. तिचा खेळ तर अधिकच धारदार आहे. पटापट पॉर्इंट संपवायचा तिचा प्रयत्न असतो. जेव्हा ह्या दोन खेळाडू लयीत खेळत असतील तेव्हा त्यांना हरवणं मोठं अवघड काम असेल.

व्हीनस विल्यम्स : वय वर्षे जरी ३७ असले तरीही ती चांगली तंदुरुस्त आहे. अजूनही पहिल्या दहांत तिचा क्रमांक लागतो. विम्बल्डनवर तर तिचा खेळ नेहमीच बहारदार होतो. तब्बल ५ वेळा तिने इथे विजय मिळवलाय. यंदा मात्र तिला खेळासोबत स्वत:च्या मनाशीही लढत द्यायची आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या हातून एक अपघात झाला ज्यात एक व्यक्ती मरण पावली. पोलिसांनी कालच तिला निर्दोष घोषित केलंय, तरीही अनवधानाने का असेना, आपण एका मृत्यूस जबाबदार आहोत, ही जाणीवच कुणाही सामान्य माणसाला हादरवून टाकू शकते.

योहाना कोंटा : मूळची आॅस्ट्रेलियन पण सध्या ब्रिटिश नागरिक असलेली योहाना अचानकपणे विजेतेपदाच्या शर्यतीत आलेली आहे. इंग्लंडमध्ये सट्टेबाजी अधिकृतपणे चालवली जाते. सध्या तिथल्या सट्टेबाजांनी योहानाचं नाव पुढे केलेलं आहे. सहावं मानांकन असलेली योहाना मस्तच खेळत आहे. यजमान देशाच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेतच, पण तसाच पाठिंबाही आहे. योहाना नक्की कोणत्या बाजूकडे बघते ते महत्त्वाचं, कारण आतापर्यंत अनेक ब्रिटिश खेळाडू अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत.

पुरुषांमधली दुसरी फळी
पुरुषांच्या दुसऱ्या फळीत जी मुख्य नावं होती त्यातल्या दोघांचं आव्हान पहिल्या चार दिवसांतच आटोपलं. स्विस स्टॅन वावरिंका आणि जपानचा केई निशिकोरी. गेली काही वर्षे दोघेही सातत्याने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेऱ्या गाठत आहेत. वावरिंका तर ३ ग्रँडस्लॅम स्पर्धाही जिंकलेला आहे. दोघांचाही खेळ मात्र गवतापेक्षा मातीवर आणि हार्ड कोर्टवर अधिक चांगला होतो. तरीही दोघांनी किमान चौथ्या फेरीपर्यंत मजल मारायला हवी होतीच.

मरिन चिलीच आणि मिलॉश रावनिच
ह्या दोघांचं साधर्म्य त्यांच्या अप्रतिम वेगवान सर्व्हिसमध्ये आहे. मिलॉश तर सध्या ‘बेस्ट सर्व्हर’ म्हणून गणला जातो. दोघांचाही सर्व्हिस सोडून इतर खेळही चांगला आहे. चिलीच माजी अमेरिकन ओपन विजेता आहे तर रावनिच गेल्या वर्षीच्या विम्बल्डन अंतिम फेरीत पोहोचला होता. यंदा उपांत्यपूर्व फेरीत दोन मातब्बर आणि ह्या वर्षीच्या दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या खेळाडूंशी ह्या दोघांची गाठ पडणार आहे. चिलीचसमोर नदालचं आव्हान असेल, तर मिलॉशपुढे रॉजर फेडररचं.

डॉमिनिक थिइम आणि साशा झेरेव
भविष्यातले सुपरस्टार खेळाडू. अफाट गुणवत्ता, तरुण वय ह्या दोघांच्याही जमेच्या बाजू. आॅस्ट्रियाच्या थिइमचाही खेळ मातीवर जास्त बहरतो, पण सगळ्या प्रकारांत जिंकण्याची क्षमता त्यात नक्कीच आहे. थोडी योग्य दिशेने केलेली मेहनत त्याला फायदेशीर ठरेल. सध्या तो अनावश्यक स्पर्धा खेळतो आणि तंदुरुस्तीत मार खातो असं माझं वैयक्तिक मत आहे. जर्मनीच्या अलेक्झांडर म्हणजेच साशा झेरेवचा खेळ परिपूर्ण आहे. सर्व्हिस वेगवान आहे, जोरदार फोरहँडचं हत्यारही आहे. पुढल्या वर्षात ह्या दोघांपैकी एक जण ग्रँडस्लॅमविजेता झालेला बघायला नक्कीच आवडेल. झाडाला नवीन पालवी कधीतरी फुटणारच. फक्त कधी ते आता बघायचं.

Web Title: Look at the second-placed players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.