लंडनमध्ये पाहिले अन् रिओमध्ये जिंकले
By admin | Published: December 31, 2016 01:51 AM2016-12-31T01:51:44+5:302016-12-31T01:51:44+5:30
लंडन आॅलिम्पिक दरम्यान मी जागतिक कुस्तीचा थरार खूप जवळून अनुभवला. त्यावेळी मी माझ्या संघाला मदत होण्यासाठी केवळ सराव शिबिरामध्ये खेळायची.
मुंबई : लंडन आॅलिम्पिक दरम्यान मी जागतिक कुस्तीचा थरार खूप जवळून अनुभवला. त्यावेळी मी माझ्या संघाला मदत होण्यासाठी केवळ सराव शिबिरामध्ये खेळायची. मात्र, पदक जिंकण्याची कसर रिओमध्ये भरून काढण्याचा माझा पक्का निर्धार होता आणि त्यात मी यशस्वी झाल्याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया कॅनडाची आॅलिम्पिक सुवर्ण विजेती महिला मल्ल एरिका विएब हिने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
प्रो रेसलिंग लीग (पीडब्ल्यूएल) स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रासाठी शुक्रवारी गतविजेत्या मुंबई महारथी संघाने एरिका आणि महाराष्ट्राचा स्टार मल्ल राहुल आवारे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या संघाची घोषणा केली. स्पर्धेच्या पहिल्या सत्रात मुंबई गरुडा नावाने खेळलेल्या गतविजेत्यांनी यंदा ‘मुंबई महारथी’ या नव्या नावाने जेतेपद राखण्याचा निर्धार केला आहे.
एरिकाने पहिल्याच प्रयत्नात आॅलिम्पिक सुवर्ण पटकावण्याचा पराक्रम केला. याबाबत तिने सांगितले की, ‘नक्कीच हे सुवर्ण माझ्यासाठी विशेष आहे. लंडन आॅलिम्पिकमध्ये संघासोबत असताना केवळ सराव केला. स्पर्धेत खेळायला मिळाले नव्हते. हे माझ्यासाठी खूप कठीण होते. मला जिंकण्याचा विश्वास होता. पण ही कसर मी रिओमध्ये भरुन काढली. लंडनमध्ये खून शिकायला मिळाले. रिओमध्ये मला खेळण्याची जेवढी उत्सुकता होती तेवढीच भिती देखील होती. त्यावेळी माझ्यावर खूप दडपणही होते, पण मला सर्वोत्तम कामगिरीचा विश्वास होता म्हणूनच मी बाजी मारली.’ (क्रीडा प्रतिनिधी)
मी बॉलिवूडची चाहती...
एरिकाने यावेळी आपल्या बॉलिवूड प्रेमाबाबतही सांगितले. ती म्हणाली, ‘मी बॉलिवूडची चाहती आहे. बॉलिवूड संस्कृती मला खूप आवाडते. बॉलिवूडची धमाल वेगळीच आहे. मी बॉलिवूडमध्ये काम करण्यास उत्सुक असून जर संधी मिळाली तर नक्कीच मी बॉलिवूडमध्ये काम करेल. बॉलिवूड चित्रपट मला आवडतात.’
भारतीय महिला मल्ल खूप मजबूत आहेत. तांत्रिकदृष्ट्या त्या खूप पुढे आहेत. त्यांच्याकडे सातत्य आहे. पीडब्ल्यूएलचा त्यांना नक्कीच फायदा होईल. मी राष्ट्रकुल आणि आॅलिम्पिक पदक पटकावले आहे. आता कमी आहे ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची. ती कमतरताही मी निश्चितच भरुन काढणार असून माझे पुढील लक्ष्य तेच आहे.
- एरिका विएब
आॅलिम्पिक प्रत्येक खेळाडूसाठी स्वर्गाप्रमाणे असते. यंदा माझी ही संधी हुकल्याचे दु:ख आहे, पण हे सर्व विसरुन मला पुढे जायचे आहे. माझे लक्ष्य २०१८ साली होणारी राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धा आहे. या लीगमध्ये हरियाणाचे वर्चस्व असल्याचे बोलले जाते. मात्र, भारताला पहिले आॅलिम्पिक पदक महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले हे विसरता कामा नये. संघात मी एकमेव महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे. यामुळे महाराष्ट्रात गुणवत्ता नाही, असा समज करणे चुकीचे आहे. - राहुल आवारे