विश्व चॅम्पियनशिपमध्ये कामगिरीत सुधारणा करण्यास उत्सुक

By admin | Published: May 15, 2017 01:32 AM2017-05-15T01:32:23+5:302017-05-15T01:32:23+5:30

अपेक्षांचे दडपण जाणवणार नाही याची खबरदारी घेत असल्याचे सांगत ज्युनिअर विश्वविक्रमवीर भालाफेकपटू नीरज चोपडाने सिनिअर पातळीवर आपले लक्ष्य गाठण्यासाठी

Looking forward to improving the world championships | विश्व चॅम्पियनशिपमध्ये कामगिरीत सुधारणा करण्यास उत्सुक

विश्व चॅम्पियनशिपमध्ये कामगिरीत सुधारणा करण्यास उत्सुक

Next

नवी दिल्ली : अपेक्षांचे दडपण जाणवणार नाही याची खबरदारी घेत असल्याचे सांगत ज्युनिअर विश्वविक्रमवीर भालाफेकपटू नीरज चोपडाने सिनिअर पातळीवर आपले लक्ष्य गाठण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. लंडनमध्ये आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी करीत गेल्या वर्षी विश्व ज्युनिअर स्पर्धेत नोंदवलेला ८६.४८ मीटर अंतराचा विक्रम मोडीत काढण्यास प्रयत्नशील असल्याचे नीरज म्हणाला.
नीरजने गेल्या महिन्यात चीनमध्ये आशियाई ग्रांप्रीच्या दुसऱ्या टप्पात ८३.३२ मीटरचे अंतर गाठत आयएएएफतर्फे आयोजित विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली. नीरज म्हणाला,‘माझे लक्ष्य आशियाई ग्रांप्री स्पर्धेत विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवण्याचे होते. चीनमधील परिस्थिती चांगली होती. मी विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवित आपले लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरलो. आता चांगली मेहनत घेत लंडनमध्ये चमकदार कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे.’
नीरज पुढे म्हणाला,‘मला चांगली तयारी करावी लागेल आणि कसून मेहनत घ्यावी लागेल. लंडनमध्ये आयोजित विश्व चॅम्पियनशिपदरम्यान आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहे. गेल्या वर्षी विश्व ज्युनिअर स्पर्धेत नोंदवलेल्या विक्रमापेक्षा सरस कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे.’ नीरजचे माजी प्रशिक्षक गॅरी कालवर्ट यांनी नीरजमध्ये ९० मीटरपेक्षा अधिक दूर भाला फेक करण्याची क्षमता असल्याचे म्हटले होते. त्याबाबत विचारले असता नीरज म्हणाला,‘मी चांगली कामगिरी करण्यासाठी कसून मेहनत घेत असून हे अंतर गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षी ८६.४८ मीटरचे अंतर गाठता आले. आता विश्व चॅम्पियनशिपमध्ये यापेक्षा सरस कामगिरी करण्यास उत्सुक आहे. एखाद्यावेळी ९० मीटरपेक्षा अधिक अंतर गाठण्यात यश येईल, अशी आशा आहे.’ नीरज पुढे म्हणाला,‘मी कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. दडपण येणार नाही, याची खबरदारी घेत आहे.’
कालवर्ट यांनी २०२० च्या आॅलिम्पिकपर्यंत करार वाढविण्यासह वेतन वाढविण्याची विनंती केली होती, पण भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने त्यांची मागणी फेटाळली. नीरज म्हणाला, ‘एएफआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला सांगितले की,
लवकरच चांगल्या प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. हे लवकर घडेल, अशी
आशा आहे.’ (वृत्तसंस्था)

एएफआयने भालाफेक प्रशिक्षकपदासाठी
युवे हॉनच्या नावाची केली शिफारस
भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) भालाफेक प्रशिक्षकपदासाठी जर्मनीचे प्रसिद्ध युवे हॉन यांच्या नावाची शिफारस केली आहे. यामुळे नीरज चोपडाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल, अशी आशा आहे.
१०० मीटरपेक्षा अधिक दूर भालाफेक करण्याची कामगिरी करणारे हॉन (५४ वर्षे) एकमेव अ‍ॅथ्लिट आहेत. १९८४ मध्ये त्यांनी १०४.८० मीटरचे अंतर गाठताना विश्वविक्रम नोंदवला होता. हा विक्रम अद्याप अबाधित आहे.
प्रशिक्षक म्हणून त्यांच्या नावाला मंजुरी मिळण्यासाठी एएफआयला आता क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
एएफआयचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले,‘आम्ही भालाफेक प्रशिक्षकपदासाठी युवे हॉन यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यांच्या नावाला क्रीडा मंत्रालायाकडून लवकरच मंजुरी मिळेल, अशी आशा आहे.’

Web Title: Looking forward to improving the world championships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.