आघाडीचे फलंदाज गमावल्यामुळे पुनरागमन करणे कठीण होते
By admin | Published: April 14, 2015 12:57 AM2015-04-14T00:57:24+5:302015-04-14T00:57:24+5:30
किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीतील अष्टपैलू कामगिरी अखेर व्यर्थच ठरल्यामुळे आॅफस्पिनर हरभजन सिंग निराश झाला.
मुंबई : किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीतील अष्टपैलू कामगिरी अखेर व्यर्थच ठरल्यामुळे आॅफस्पिनर हरभजन सिंग निराश झाला. मुंबई इंडियन्सचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे सामन्यात पुनरागमन करणे कठीण होेते, अशी प्रतिक्रिया हरभजनने व्यक्त केली. हरभजनने सुरुवातीला गोलंदाजीमध्ये छाप सोडताना ४ षटकांत २० धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. त्यानंतर त्याने फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करीत ६४ धावा फटकावल्या. त्यात ६ षटकारांचा समावेश आहे.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना हरभजन म्हणाला, ‘‘आम्ही सुरुवातीला अधिक फलंदाज गमावले नसते तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. सुरुवातीला भागीदारी झाली असती आमचा डाव सावरला गेला असता, पण असे घडले नाही. त्याचे श्रेय पंजाब संघाच्या गोलंदाजांना मिळायलाच हवे. त्यांनी नव्या चेंडूने चांगला मारा केला. ४ बाद २५ आणि त्यानंतर ५ बाद ४६ अशी अवस्था असताना पुनरागमन करणे कठीण होते. आमच्यासाठी ही लढत चांगली ठरली नाही, पण अखेर लक्ष्याच्या समीप जाण्यास यशस्वी ठरल्यामुळे समाधान वाटले. त्यामुळे यानंतर खेळल्या जाणाऱ्या लढतींसाठी आमचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल.’’ हरभजन म्हणाला, ‘‘आम्हाला चांगली फलंदाजी करण्याची गरज होती. रोहित लवकर बाद झाल्यामुळे संघाला
धक्का बसला. कोरी अँडरसन व
किरोन पोलार्ड संघात असले, तरी रोहितकडून संघाला मोठ्या खेळीची गरज होती. (वृत्तसंस्था)
मुंबई इंडियन्स संघासाठी गोलंदाजांनी पहिल्या सहा षटकांत चांगली कामगिरी करणे आवश्यक असते. रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत आम्ही अधिक धावा बहाल केल्या. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या वीरेंद्र सेहवाग व मुरली विजय यांनी सुरुवातीला वेगाने धावा फटकावल्या. पंजाब संघाने पहिल्या पाच षटकांत जवळजवळ अर्धशतकाची मजल मारली होती. त्यानंतर आम्ही पंजाब संघाच्या फलंदाजावर वर्चस्व गाजवले. या खेळपट्टीवर १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे शक्य होते. रोहित शर्मा सुरुवातीलाच बाद झाल्यामुळे संघ अडचणीत आला.
- हरभजन सिंग