संधी गमावल्यामुळे विजयाचे हकदार नव्हतो
By admin | Published: July 11, 2017 02:14 AM2017-07-11T02:14:45+5:302017-07-11T02:14:45+5:30
वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० लढतीमध्ये रविवारी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाच्या कामगिरीवर टीका केली आहे
किंग्जस्टन : वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० लढतीमध्ये रविवारी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाच्या कामगिरीवर टीका केली आहे. आमच्या खेळाडूंनी फलंदाजी व गोलंदाजीमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यामुळे आम्ही विजयाचे हकदार नव्हतो, असे कोहली म्हणाला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद १९० धावांची मजल मारली, पण एविन लुईसने ६२ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १२५ धावांची खेळी करीत टी-२० विश्व चॅम्पियन वेस्ट इंडिज संघाला १८.३ षटकांत विजयी लक्ष्य गाठून दिले. लुईसने शतकी खेळी १२ षटकार व ६ चौकारांनी सजवली.
कोहली म्हणाला, ‘टी-२० क्रिकेटमध्ये अनेकदा वाईट दिवसाला सामोरे जावे लागते. विंडीजचा टी-२० संघ चांगला आहे. गेल्या काही वर्षांपासून हे खेळाडू खेळत आहेत. आमचा संघ सध्या संक्रमणाच्या स्थितीत आहे. त्यामुळे चढ-उतार अनुभवायला मिळत आहेत.’
दुसऱ्या बाजूचा विचार करता विंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने विजयानंतर आनंद व्यक्त केला.
ब्रेथवेट म्हणाला, ‘मी खूश आहे. आम्ही फलंदाजांना नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला होता. जो खेळाडू अर्धशतक झळकावेल त्याला माझ्या मानधनातील अर्धी रक्कम देण्यात येईल, असे मी जाहीर केले होते. आम्ही आमच्या चाहत्यांना खूश करण्यास प्रयत्नशील होतो. आम्ही आयपीएल बघितले असून डेथ ओव्हर्समध्ये भुवनेश्वर कशी गोलंदाजी करतो, याची कल्पना होती.’
(वृत्तसंस्था)
>झेल सोडल्यामुळे
पराभव : कार्तिक
सुमार क्षेत्ररक्षणामुळे विंडीजविरुद्ध रविवारी टी-२० लढतीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. झेल सोडणे महागात पडले, अशी प्रतिक्रिया भारतीय फलंदाज दिनेश कार्तिकने
व्यक्त केली.
सहाव्या षटकात एविन लुईसचा भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर उडालेला झेल कोहली व मोहम्मद शमी यांच्यादरम्यान ताळमेळ नसल्यामुळे सुटला. त्यानंतर चार चेंडूंनंतर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला
झेल कार्तिकला टिपण्यात
अपयश आले.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कार्तिक म्हणाला, ‘जर मिस हिटवरही चेंडू सीमारेषेबाहेर जात असेल तर हा फलंदाजाचा दिवस असल्याचे आपल्या लक्षात येते. लुईसने आम्हाला दोन संधी दिल्या, पण त्याही आम्हाला कॅश करता आल्या नाहीत. आम्ही अनेक झेल सोडले आणि त्यामुळे सामन्यावरील पकड निसटली.’
भारतातर्फे २९ चेंडूंमध्ये ४८ धावांची खेळी करणारा कार्तिक म्हणाला,‘१९० ही वाईट धावसंख्या नव्हती, पण लुईसची फलंदाजी बघितल्यानंतर हे आव्हान खुजे ठरले. त्याने चौकारांच्या तुलनेत षटकार अधिक ठोकले.’
दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला या लढतीत खेळता आले नाही. कार्तिकच्या मते त्याची संघाला उणीव भासली. पांड्या अष्टपैलू खेळाडू असून गोलंदाजी व फलंदाजीमध्ये त्याची आम्हाला उणीव जाणवली, असेही कार्तिक म्हणाला. (वृत्तसंस्था)
ही चांगली लढत होती. भारतासारख्या संघाविरुद्ध शतक झळकावणे प्रतिष्ठेची बाब आहे. मला सलग पाच सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण मी स्वत:वरील विश्वास ढळू दिला नाही आणि या लढतीत मला त्याचा लाभ झाला.
- एविन लुईस
आम्ही फलंदाजी करताना २५-३० जास्तीच्या धावा फटकावू शकलो असतो. आम्हाला २३० धावा फटकावण्याची संधी होती, पण आम्ही संधी गमावली आणि त्यामुळे आम्ही विजयाचे हकदार नव्हतो. एका फलंदाजाला डावामध्ये सूत्रधाराची भूमिका बजावणे आवश्यक होते. दिनेशने चांगला खेळ केला, पण कुणीतरी ८०-९० धावांची खेळी करणे अपेक्षित होते. त्यानंतर आमची गोलंदाजीही चांगली झाली नाही.
- विराट कोहली, कर्णधार